Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 April, 2008

भाजपतील वादळ शमले गोपीनाथ मुंडे यांचा राजीनामा मागे

नवी दिल्ली, दि.२२ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदासह सर्व पदांचा दिलेला राजीनामा मागे घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांची भेट घेतल्यानंतर मुंडे यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली. राजीनामा मागे घेतल्यानंतर लगेचच मुंडे आपल्या कामालाही लागले आहेत, हे विशेष.
राजनाथसिंग यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर तिथेच नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत, आता कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत, त्यामुळे आपण राजीनामा मागे घेत आहोत, असे मुंडे यांनी सांगितले.यापुढील निवडणुका प्रदेशाचे अध्यक्ष नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर, एकनाथ खडसे आणि पक्षाच्या तमाम नेते व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढू व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचे काम करू, असा निर्धार यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करायची याचा निर्णय आमचे अध्यक्ष नितीन गडकरी हेच घेतील आणि त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य राहील, असेही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी सांगितले की, राज्यातील निवडणुका गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्वात लढायच्या ही आमची भूमिका कालही होती, आजही आही आणि उद्याही राहील. याबाबत कोणतेही दुमत नाही.
राजीनामा देत थेट मीडियाशी बोलण्यापूर्वी आपण जर आपल्या भावना माझ्याजवळ व्यक्त केल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते असे अडवाणी मला म्हणाले आणि अडवाणी यांचे म्हणणे मलाही उचित वाटले. मला आता असे वाटते की, मी मीडियाशी बोलण्यापूर्वी अडवाणी यांच्याशी बोलायला हवे होते, असे मुंडे यांनी प्रांजळपणे सांगितले.
दरम्यान, आपण मुंबईला परत जाणार नसून, उद्या जयपूर येथे जाणार आहोत. पक्षाचा सरचिटणीस या नात्याने राजस्थानचा प्रभार माझ्याकडे आहे आणि आमचे निवडणूक प्रभारी व्यंकय्या नायडू हे उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर असून, जयपूर येथे पक्षाची बैठक होणार आहे, त्या बैठकीसाठी मी जयपूरला जात असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
पक्षश्रेष्ठींच्या बोलावण्यावरून गोपीनाथ मुंडे आज सकाळी दिल्लीला पोहोचले. विमानतळावरून ते थेट लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी गेले. तिथे अडवाणी यांच्याशी त्यांनी सर्व मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेच्या वेळी प्रदेश भाजपाध्यक्ष नितीन गडकरी हेही उपस्थित होते. अडवाणी यांच्याशी दोन टप्प्यात झालेल्या चर्चेनंतर आपल्या सर्व तक्रारींचे निराकरण झाले असे सांगत मुंडे यांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.
अडवाणी यांच्याशी काही मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर बैठक मध्येच थांबवावी लागली. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी अडवाणी यांना जायचे होते. बैठक आटोपल्यानंतर अडवाणी परत आले आणि चर्चेचा दुसरा टप्पा आटोपला. या टप्प्यात मुंडे यांच्या सर्व तक्रारींवर तोडगा काढण्यात आला आणि भाजपात उठलेले चहाच्या पेल्यातील वादळ अखेर शांत झाले.
मुंडे यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी मुंडे यांच्याशी संपर्क केल्यानंतर आणि त्यांना दिल्लीला बोलावण्यात आल्यानंतर मुंडे आज सकाळी दिल्लीला गेले. यावेळी त्यांच्यासोबत किरीट सोमय्या आणि पूनम महाजन आदी नेते होते. तत्पूर्वी, मुंडे यांनी सोमवारी रात्री आपल्यावतीने पक्षश्रेष्ठींशी बोलण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर आणि विधानसभेतील गटनेते एकनाथ खडसे यांना दिल्लीला पाठविले होते. या दोन्ही नेत्यांनी सोमवारी रात्रीच पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीविषयी माहिती दिली होती.
गोपीनाथ मुंडे यांनी जरी पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता, तरी पक्ष सोडून जाणार नाही, पक्षात राहूनच संघर्ष करू, पुणे ते गोंदिया अशी संवाद यात्रा काढून कार्यकर्त्यांना भेटू व त्यांच्या भावना जाणून घेत अंतिम निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपात फूट पडेल अशी शक्यता अजीबात वाटत नव्हती. ज्या पद्धतीने संपूर्ण घटनाक्रम हाताळण्यात आला, त्यावरून आपला पक्ष अजूनही शिस्तप्रिय असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे.
मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली होती. मुंबईला राजीनामा पत्रे त्यांनी दिले होते व संभघजीनगरला पत्रकारांशी बोलताना त्यांनी या राजीनाम्यांची घोषणा केली होती. त्यानंतर मुंडे सोमवारी मुंबईत आले, विधानभवनातही गेले. दुपारी त्यांनी सहकार मंत्री पतंगराव कदम यांच्या दालनात जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर ते सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात गेले. त्याठिकाणी ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील हेही होते. त्यांच्या उपस्थितीत चहापान झाले. त्यानंतर मुंडे यांनी रात्री शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या निवासस्थानी रात्रीचे जेवण घेतले. यावेळीही छगन भुजबळ उपस्थित होते. हा सर्व घटनाक्रम बघता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात होते. पण, राजीनामा मागे घेत आणि भाजपा वाढविण्याचा निर्धार व्यक्त करीत सर्व तर्कवितर्कांना विराम दिला.

No comments: