Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 April, 2008

जागेचा वाद निवळणार

बांदोडकर प्रतिष्ठान: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): कै. भाऊसाहेब बांदोडकर प्रतिष्ठानला पर्वरी येथील नियोजित जागा बहाल करण्याच्या आदेशाला खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कार्यालयातूनच तात्पुरती स्थगिती देण्याच्या वृत्तामुळे आज भाऊप्रेमींत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. मगोपचे आमदार दीपक ढवळीकर यांनी यासंदर्भात त्वरित मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता येत्या दोन दिवसांत हा वाद संपुष्टात आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.
महसूल खात्याने पर्वरी येथील सेरूला कोमुनिदादच्या मालकीची जागा कै.भाऊसाहेब बांदोडकर प्रतिष्ठानला देण्याचा आदेश जारी केल्यानंतर पैसे भरण्यास गेलेल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना सेरूला कोमुनिदादने असहकार्य केल्याची माहिती मिळाली आहे. हे पैसे स्वीकारण्यास नकार देण्यात आल्याने आज अखेर प्रतिष्ठानतर्फे "डिमांड ड्राफ्ट' व पत्र "रजिस्टरएडी' पद्धतीने पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली. दरम्यान, ही जागा प्रतिष्ठानला देण्यास एका बड्या कॉंग्रेस नेत्याची हरकत असल्याची जोरदार चर्चा आहे. या नेत्याकडूनच विनाकारण कुरापती काढून या जागेची विभागणी करून त्यातील अर्धी जागा कॉंग्रेस भवनासाठी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी ही जागा प्रतिष्ठानला देण्याचा निर्णय घेतल्याने दुखावलेल्या त्या नेत्याने या विषयावरून थयथयाट केल्याचीही वृत्त आहे. सेरूला कोमुनिदादशी या नेत्याचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांना हाताशी धरून प्रतिष्ठानकडून या जागेसाठीची रक्कम न स्वीकारण्याची भूमिका घेण्याबरोबर मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून हा आदेश स्थगित ठेवण्यास भाग पाडेपर्यंत त्या नेत्याने मजल मारल्याचे समजते.
दरम्यान, प्रतिष्ठानचे बहुतांश नेते कॉंग्रेस पक्षातच असल्याने त्यांची कुचंबणा झाली आहे. आपल्याच सरकारकडून मिळवलेल्या या जागेला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच स्थगिती देण्यात आल्याने त्यांची बोलतीच बंद झाली आहे. त्या नेत्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची धमकही या नेत्यांमध्ये नसल्याने "इकडे आड तिकडे विहीर' अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी केंद्रीयमंत्री ऍड.रमाकांत खलप, डॉ.काशीनाथ जल्मी व धर्मा चोडणकर हे कॉंग्रेसमध्ये असून प्रा.सुरेद्र सिरसाट हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहेत.
कै.भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सध्या कॉंग्रेस पक्षाबरोबरच सरकारात सामील असल्याने हा मुद्दा मगोपसाठी महत्त्वाचा ठरला आहे. याबाबत मगोपने सावध भूमिका घेतली असली तरी मगोपचे आमदार दीपक ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांशी याप्रकरणी चर्चा केल्याचे ते म्हणाले. ही जागा प्रतिष्ठानला देण्यास सेरूला कोमुनिदादचा विरोध असून त्यांचे शिष्टमंडळ भेटल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याचे ढवळीकर म्हणाले. सदर जागेसाठीचे पैसे न स्वीकारण्याचेही कोमुनिदादने ठरवल्यानेच तात्पुरती स्थगिती देण्याचा आदेश दिल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली. येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असेही ढवळीकर म्हणाले.
भाऊसाहेब प्रतिष्ठान उभारण्यासाठी मगोप पुढाकार घेणार असल्याचे सांगून प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मगोपला पूर्ण सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गेली दहा वर्षे रखडत असलेल्या या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरजही ढवळीकर यांनी व्यक्त केली.

No comments: