Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 February, 2008

साखळीच्या पित्रे कुटुंबीयांना
कणकवलीत अपघात, एक ठार

साखळी, दि. 9 (वार्ताहर)- कणकवली वागदेपूलावरून सुमारे 20 मीटर खाली वाहन कोसळल्याने साखळी विठ्ठलापूर येथील श्रीमती आनंदी ऊर्फ शीला पित्रे (62) यांचे जागीच निधन झाले तर अन्य पाच जण जखमी होण्याची घटना आज घडली.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या गोवा शाखेचे अध्यक्ष रमापती पित्रे हे आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूरला देवदर्शनासाठी जात होते. कालच नवे "मारुती 800' (जीए.04-सी-0627) हे वाहन खरेदी केल्याने देवदर्शनाचा हा कार्यक्रम त्यांनी आखला होता. आज सकाळी सुमारे पावणे नऊ वाजता त्यांचे वाहन गोवा-मुंबई महामार्गावरील वागदे पुलाजवळ पोहचले असता समोरून भरधाव वेगात आलेल्या सुमो जीपला बाजू देण्याच्या नादात वाहनावरील ताबा गेल्याने त्यांचे वाहन सुमारे 20 मीटर दरीत कोसळले. या अपघातात रमापती पित्रे यांच्या आई आनंदी ऊर्फ शीला केशव पित्रे यांचे जागीच निधन झाले तर रमापती पित्रे, स्नेहा र. पित्रे , पांडुरंग ऊर्फ राजेश पित्रे, साक्षी पांडुरंग पित्रे व कुमार कुशाग्रह पांडुरंग पित्रे (4) आदी जखमी झाले. रमापती यांच्या पत्नी स्नेहा पित्रे या वाहन चालवत होत्या. त्यांनाही जबर मार बसल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली.
या अपघाताचे वृत्त कळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपजिल्हारूग्णांलयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तिथून त्यांना लगेच गोव्यात गोमेकॉत उपचारासाठी पाठवण्यात आले. स्नेहा पित्रे यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून उर्वरितांना उपचाराअंती घरी पाठवण्यात आले.
श्रीमती आनंदी पित्रे यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,अशी माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे यशवंतराव विद्यापीठाचे सगळे वर्ग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

No comments: