Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 February, 2008

राज ठाकरेंची अटक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होणार असल्याच्या वावड्यांनी मुंबईसहित महाराष्ट्राच्या विविध भागांत सध्या जो तणाव निर्माण झाला होता त्याची कोंडी अखेर मंगळवारी झालेल्या त्यांच्या अटकेने व नंतर मिळालेल्या जामिनाने फुटली. राज ठाकरे यांना अटक होणार या अफवेमुळे मुंबईसहित महाराष्ट्राच्या अनेक भागात तणाव होता. मंगळवारी दुपारी ही अटक होताच बऱ्याच ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. नाशिकात एकाला जीव गमवावा लागला तर काही ठिकाणी वाहने आगीच्या भक्षस्थानी पडली. बाजारपेठाही धडाधड बंद झाल्या. कदाचित राज यांना कोठडीत जावे लागले असते तर परिस्थिती अधिकच चिघळली असती. सुदैवाने ती परिस्थिती टळली. राज यांना झालेली ही अटक आणि शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना झालेली अटक यात बरेच साम्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात त्या काळी वसंतराव नाईक यांची सत्ता होती आणि बाळासाहेबांनी भूमिपुत्रांच्या विषयावरून शिवसेनेला एक सन्माननीय स्थान मिळवून दिले. बाळासाहेबांचे वलय फार मोठे होते. त्यांना अटक झाली आणि त्यानंतर बाळासाहेब आणि शिवसेनेला मागे वळून पाहावे लागले नाही. आज राज ठाकरे सुध्दा अशाच एका वेगळ्या वळणावर उभे आहेत. महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यावरून अटक होण्यापर्यंतची परिस्थिती त्यांनी आपल्या अत्यंत योजनाबद्ध डावपेचांद्वारे निर्माण केली. महाराष्ट्राच्या हिताची चिंता शिवसेनेला नव्हे तर मनसेला अधिक आहे हेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यात ते यशस्वी ठरले आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात त्यांनी अस्वस्थता निर्माण केली आहे. राज यांना अटक करून मनात नसतानाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युती सरकारला राज यांच्या या डावपेचांना हातभार लावावा लागला.
राज यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध पुकारलेले युद्ध योग्य की अयोग्य हा वादाचा विषय आहे. मुंबईतील मराठी जनतेला या संदर्भात काय वाटते यावर देखील काही चॅनलवाल्यांनी ओपिनियन पोल घेतले आणि जाहीरही केले. परंतु या वादाच्या दरम्यान काही चॅनलनी घेतलेल्या एकतर्फी भूमिकेमुळे त्यातील काहींजण आपली विश्वासार्हताच गमावून बसले. ही लढाई आपलीच आहे आणि राज ठाकरेच्या विरोधात लढणे हे आपले कर्तव्यच आहे या दृष्टिकोनातून काहींनी अतिरंजित आणि भडकावू बातम्या देऊन एकूण वातावरणच बिघडवून टाकले. राज ठाकरे यांना त्याचे नुकसान होण्याऐवजी फायदाच झाला. उत्तर भारतीयांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे त्रस्त असलेल्या मुंबईतील मराठी, गुजराती व इतर नागरिकांची राजना सहानुभूतीच मिळाली. राजनीं छेडलेल्या या आंदोलनामुळे खरी गोची शिवसेनेची झाली. काही जाणकारांच्या मते राज यांना अटक करण्यामागे शिवसेनेला शह देण्याचीच कॉंग्रेस व राष्ट्रवादीची चाल आहे. काही वर्षापूर्वी वसंतराव नाईकांनी बाळासाहेब ठाकरे यांना मोठे केले तर आता विलासराव आणि आर. आर. पाटील राजला मोठे करू पाहत आहेत अशी टीका खुद्द भाजपचे नेते नितीन गडकरी यांनीच केली आहे, यात बरेच काही आले. खरे तर आपले काका तसेच सख्खे चुलतभाऊ - मावसभाऊ यांच्यापासून फारकत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राजनीं मनसेच्या झेंड्याखाली आपली वेगळी चूल मांडली होती. मुंबईसहित महाराष्ट्राच्या काही भागात ते हळूहळू आपला जमही बसवू पाहत होते. परंतु ही गती पुरेशी नव्हती. त्यासाठी त्यांना लोकांच्या जिव्हाळ्याचा काहीतरी विषय हवा होता. समाजवादी पक्षाच्या मुंबईतील मेळाव्याने आणि छटपुजेच्या निमित्ताने त्यांना ही संधी मिळाली. अमिताभ बच्चनवर टीकेची झोड उठवून त्यांनी वादाला तोंड फोडले आणि जया बच्चन, अमरसिंग आणि अबू आझमी यांना त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर देऊन आगीत तेल ओतले. हा वाद इतका भडकेल आणि गोष्टी इतक्या थरापर्यंत जातील याची कल्पना त्यातील कोणालाच नव्हती. राज यांना मात्र ते अभिप्रेत असावे. कारण पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनानुसार घडल्या असे म्हटले तर ते फारसे चुकू नये. कारण या संपूर्ण वादाचे केंद्र बिंदू राज ठाकरेच राहिले. राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी केलेल्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे राज अधिकच प्रकाश झोतात आले. कालचा दिवस तर त्यांचाच होता. देशातील सगळ्याच प्रमुख दूरदर्शन वाहिन्यांनी आपले संपूर्ण प्रक्षेपण राजच्या अटकेवरच केंद्रित केले. राजलाही हेच अभिप्रेत असावे. राजच्या अटकेच्या केवळ अफवेने तणाव आणि दंगा निर्माण होऊ शकतो ही गोष्टही त्यातून स्पष्ट झाली. त्यामुळे राज यांना लोकप्रियतेची नवी परीक्षा देण्याचीही आता गरज नाही.
यात खरी गोची झाली ती गडकरी म्हणतात त्या प्रमाणे शिवसेनेचीच. उद्धव ठाकरेंसहित शिवसेनेतील अनेक नेत्यांनी राजविरूद्ध आक्रमक विधाने केली. थोरल्या बाळासाहेब ठाकरे यांनी एक पाऊल पुढे मारताना ज्या अमिताभ बच्चनवरून हा विषय सुरू झाला होता, त्या अमिताभ बच्चनची चक्क बाजूच घेतली. मात्र आता धनुष्यातून बाण सुटलेला आहे. मराठी माणसाच्या मुद्यावरून राज यांना अटक झालेली आहे. अशावेळी मराठी माणसाच्या हितासंदर्भात आता वेगळी परीक्षा देण्याची त्यांना गरज भासणार नाही. या उलट महाराष्ट्र आणि मराठी या मुद्यांपासून आपण दूर गेलेलो नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याची पाळी आता शिवसेनेवर आली आहे. ही वस्तुस्थिती आहे. राज नावाचे अस्त्र बोथट करण्यासाठी खुद्द बाळासाहेबांनाच आता काहीतरी करावे लागणार आहे.

No comments: