Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 13 February, 2008

चार जणांना जिवंत जाळणारा
जन्मठेपेचा कैदी
आग्वादहून फरारी

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - चार जणांना जिवंत जाळून मारल्याच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी शरण बसप्पा ऊर्फ किरण मोपूकर(२९) याने आज आग्वाद तुरुंगातून पलायन केल्याने खळबळ माजली आहे.
आज सकाळी सुमारे ७ वाजता आग्वाद तुरुगांतील स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाजातून त्याने पलायन केल्याचे उघड झाले आहे. सकाळी या दरवाजावर ड्युटीवर असलेला तुरुंगरक्षक विजय आर. गावकर व मुख्य रक्षक गुरुदास वारंग यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याविषयीचे आदेश तुरुंग महानिरीक्षक तथा उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी काढले. ज्या दरवाजातून पलायन झाले त्या ठिकाणी तुरुंग रक्षक विजय गावकर याची ड्युटी होती. परंतु, तो त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित नसल्याने कैदी पळून जाण्यास यशस्वी झाल्याचा कयास सध्याच्या चौकशीत व्यक्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेचा चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक वसंत बोडणेकर यांनी दिली. या घटनेची पोलिस तक्रार कळंगुट पोलिस स्थानकावर तुरुंग अधिकारी महेश फडते यांनी दाखल केली आहे. शरण याच्या उजव्या हातावर जळल्याची खूण असून त्याच हातावर एक धार्मिक चिन्ह कोरलेले आहे. मध्यम बांधणीचा असून तो कृष्णवर्णीय आहे.
गेल्या चतुर्थीच्या काळात मडगाव येथील न्यायालयीन कोठडीतून १४ कैद्यांनी पलायन केल्यानंतर सर्व तुरुंगांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली होती. या घटनेनंतर आग्वाद तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेत केंद्रीय राखीव दलाचे अतिरिक्त ३० जवान तैनात करण्यात आले होते. तरीही कैद्याने पलायन केल्याने तुरुंगाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. १९९२ ते २००८ पर्यंत गंभीर गुन्ह्याखाली शिक्षा भोगणाऱ्या सुमारे आठ कैद्यांनी पलायन केल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मडगाव येथील सत्र न्यायालयाने आरोपी शरण बसप्पा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर दि. १३ जुलै ०७ रोजी त्याला आग्वाद तुरुंगात आणले होते. आज सकाळी सहा वाजता तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या १२० कैद्यांना बाहेर काढून त्यांची शिरगणती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्यांना कोठडीत पाठवण्यात आले. सकाळीचा नाश्ता बनवण्यासाठी १२ कैद्यांची निवड करण्यात आली. यात शरण बसप्पा याचा समावेश होता. सर्व कैदी स्वयंपाक घरात सकाळचा नाश्ता बनवण्याच्या गडबडीत असतानाच शरण याने मागील दारातून पलायन केले. त्याला भांडी धुण्याचे काम देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कैदी स्वयंपाक घरात काम करीत असताना नेहमीच या मागील दरवाजावर तुरुंग रक्षक तैनात करण्यात येतो. यावेळी विजय गावकर या तुरुंग रक्षकाची त्याठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. परंतु, तो त्याठिकाणी हजर नसल्याने शरण याला पळून जाण्यास आयतीच संधी उपलब्ध झाली.
या स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूला सुमारे १३ फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. या भिंतीवरून उडी मारून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भिंतीवर तो कसा चढला याचा शोध सध्या घेतला जात आहे.
शरण याच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी
दि. ९ ऑगस्ट ०५ रोजी मध्यरात्री वास्को येथील जेटी खारेवाडा चाळीत शरण बसप्पा याने रुपसींग याच्या घरावर रॉकेल ओतून चार जणांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. यावेळी शरण याने घराबरोबरच शेजारच्या अन्य सहा घरांचे दरवाजे बाहेरून बंद केल्याने या भीषण आगीत आत झोपलेल्या चौघांचा होरपळून जागीच अंत झाला होता. यात रुपसिंग नाईक(३५), रत्ना रुपसिंग नाईक(२५), त्यांची मुलगी नीला (९) अन्य एक वृद्ध महिला नातेवाईक आगीत होरपळून जळून खाक झाले होते. यावेळी आरोपी शरण बसप्पा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चोवीस तासाच्या आत अनमोड येथे अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सॅमी तावारिस, उपनिरीक्षक रवी देसाई, कारासिलिओ पो, संजय दळवी, श्री. शेटगावकर यांनी केला होता.

No comments: