Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 13 February, 2008

एमपीटीविरोधात वास्कोत भव्य मोर्चा
बंद मागे पण सागरी व्यवहार बंद

वास्को, दि. १२ (प्रतिनिधी)-एमपीटी (मुरगांव पोर्ट ट्रस्ट)तर्फे होत असलेल्या कथित सतावणुकीच्या निषेधार्थ मुरगांव बचाव अभियानातर्फे कालपासून पुकारण्यात आलेल्या वास्को बंद चे आज सकाळी एम. पी. टी च्या विरोधात भव्य मोर्च्याने रूपांतर होऊन नंतर वास्कोतील दुकानदारांना व इतर व्यवस्थापनांना आपला व्यवसाय सुरू करण्याचे घोषित करण्यात आले. मात्र जोपर्यंत एमपीटी मुरगांव बचाव अभियानाच्या मागण्या पूर्ण करीत नाहीत तोवर समुद्रातील सर्व व्यवहार ठप्प राहणार असून एमपीटीचा व्यवसाय रोखण्यात येणार आहे.
एमपीटीकडून होत असलेल्या सतावणुकीचे प्रत्युत्तर देण्यासाठी अखिल गोवा बार्ज मालक संघटना, अखिल गोवा मच्छीमारी नौका मालक संघटना, मुरगांव लॉन्च मालक संघटना, युनायटेड बार्जमन असोसिएशन, देस्तेरो मच्छीमार संघटन, बायणा रापणकार व मच्छीमार नौका मालक संघटना, वाडे सिटीझन फोरम व इतर (एकूण १४) संघटनांनी मिळून मुरगांव बचाव अभियानांची स्थापना केली व नंतर त्यांनी एमपीटीला त्याच्या मागण्या निवेदनाव्दारे सादर करून तीन दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचे नमूद केले होते. निवेदन सादर करून तीन दिवस पूर्ण होऊन सुध्दा एमपीटीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे समजताच अभियानाने एमपीटीच्या विरुद्ध लढा उचलण्याचे ठरवून काल १०० टक्के वास्को बंद पाळले. काल सकाळपासून वास्कोतील सर्व दुकाने, मासेमार्केट, भाजी मार्केट तसेच समुद्रातील सर्व व्यवसाय ठप्प करण्यात आला, तसेच सुमारे ३५० मच्छीमारी नौका, १५० बार्जेस व ३५ लॉन्चेसनी एम. पी. टी. च्या समुद्री क्षेत्रात नौका नांगरून त्यांचा व्यवसाय बंद करून टाकला, तसेच एमपीटीच्या धक्का क्र. ९ वर वाहने उभी करून तेथून होणारा कोळसा व्यवसाय बंद पाडला. या सर्व गोष्टींबरोबर हजारो संख्येने नागरिकांना सडा येथील एमपीटीच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन व्यवस्था व एमपीटीचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांच्याविरुद्ध घोषणा केल्या. प्रवीण अगरवाल यांची प्रतिमा यावेळी जाळण्यात आली. यावेळी एमपीटीच्या काही अधिकाऱ्यांनी तेथे येऊन मोर्चातील उपस्थितांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र अगरवाल यांना बोलवा (बोलणीसाठी) असे सांगून त्यांना येथून हाकलून लावले. शेवटी अगरवाल तेथे येऊन उपस्थित मोर्चातील समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तोही अयशस्वी ठरला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही व ह्या पूर्ण करण्याचे आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगून येथून निघून गेले. या घटनेनंतर काल पूर्ण वेळ वास्कोतील दुकाने व इतर व्यवस्थापने (औषधालय वगळता) ठप्प राहिली.
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तीन हजारांहून अधिक नागरिकांनी मुरगांव बचाव अभियानाच्या झेंड्याखाली एमपीटी विरोधात मोर्चा काढला. मुरगांव नगरपालिकेसमोर या मोर्चाची सांगता झाली. यानंतर ""मुरगांव बचाव अभियानाचे'' प्रवक्ते सायमन परेरा यांनी अभियानाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच गरज भासल्यास पुन्हा मुरगांवच्या हितासाठी अभियानाने बंद पुकारल्यास येथील जनतेने उभे राहण्याचे सांगून वास्कोतील सर्व दुकानदार व इतर व्यवस्थापनांना आता बंद मागे घेऊन व्यापार सुरू करण्याचे सांगितले. दुपारी १२.३० नंतर वास्कोतील सर्व दुकाने, बससेवा सुरळीत झाली मात्र पाण्यातील सर्व व्यवसाय अजूनपर्यंत ठप्प असून कोळसा हाताळण्याचे बंद करण्याचे हार्बर सडा येथील १९२२ सालापासून असलेला खुरिस न हलविण्याचे वाडे येथे मच्छीमारी जेटी न येण्यासाठी तसेच बचाव अभियानाच्या इतर मागण्या पूर्ण करण्याचे लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत हा बंद चालू राहणार असून एमपीटीला सुध्दा यामुळे करोडांचे नुकसान सोसावे लागणार आहे.

No comments: