Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 February, 2008

राजीनामा देण्यास मंत्री
तयार नसल्याने श्रेष्ठी पेचात

पणजी, दि. 13 (प्रतिनिधी)- मंत्रिपदाला हात लावल्यास किंवा खाते बदलाचे प्रयत्न केल्यास सरकार खाली खेचू अशा धमक्यांपुढे कॉंग्रेस श्रेष्ठीही हतबल झाले आहेत. राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांची समजूत काढून हा वाद मिटवण्याच्या अटीवर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी निर्णय घेण्याचे ठरल्याने दिल्लीतील नेते परतीच्या वाटेवर निघाले आहेत.
वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे प्रयत्न राज्यातील अनुसूचित जमात संघटनेच्या इशाऱ्यामुळे निष्फळ ठरले आहेत. जलस्त्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांना वगळल्यास कॉंग्रेस पक्षाची वोटबॅंक असलेला ख्रिस्ती समाज दुखावेल, अशा द्विधा मनःस्थितीत श्रेष्ठी सापडले आहेत. सुदिन यांचा मंत्रिमंडळातील समावेश ही शरद पवार यांची मागणी असली तरी त्यामागचे खरे सूत्रधार आरोग्यमंत्री विश्वजित राणे हेच असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढावी, असेही यावेळी ठरवण्यात आले. गोव्यात आघाडी सरकारच्या घटकांनी माजवलेला गोंधळ ही अत्यंत शरमेची गोष्ट असून त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची कानउघाडणी श्रीमती सोनिया गांधी यांनी केल्याचीही खबर मिळाली आहे.
कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी हा निर्णय तूर्त लांबणीवर टाकल्याचे सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याने तोपर्यंत इतर उपायांचे प्रयत्न केले जातील, असेही संकेत त्यांनी दिले. दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर दोन वेळा विधानसभा अधिवेशन काळात त्यांनी सभापती व राज्यपालांच्या आश्रयाने सरकार टिकवून ठेवले खरे, परंतु येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना आपले बहुमत सिद्ध करणे अपरिहार्य आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना उद्या दिल्लीत अन्य एक बैठक असल्याने ते उद्या गोव्यात परतणार आहेत.

No comments: