Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 11 February, 2008

एमपीटीच्याविरोधात
आज वास्को बंद
समुद्रातील उलाढालही ठप्प

वास्को, दि. 10 (प्रतिनिधी)- कोळसा प्रदूषण आणि विस्तारवादी धोरण यांच्यासंबंधात केलेल्या मागण्या मुरगाव पोर्ट ट्रस्टकडून (एमपीटी) दिलेल्या मुदतीत पुऱ्या न झाल्याने आज मध्यरात्रीपासून समुद्रातील सर्व व्यवसाय तसेच वास्को बंद ठेवण्याचा निर्णय मुरगाव बचाव अभियानाने आज तातडीच्या बैठकीत घेतला. मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या मनमानीचा निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन लढा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या "मुरगाव बचाव अभियान' ने दिलेल्या बंदच्या हाकेमुळे सोमवारी वास्कोतील सर्व दुकाने तसेच मासळी व भाजी मार्केट बंद राहणार असून एमपीटीकडून होणाऱ्या कोळसा व्यापारावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांची तातडीने उचलबांगडी करावी तसेच ट्रस्टवर गोमंतकीयांची बहुसंख्या असावी, अशाही मागण्या अभिनानाने आता केल्या आहेत. 5 जानेवारी रोजी 14 संघटनांनी एकत्र येऊन एमपीटीच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी "मुरगाव बचाव अभियान' स्थापन केले होते. या 14 संघटनांमध्ये बार्ज मालक (अखिल गोवा) संघटना, अखिल गोवा मच्छिमार नौका संघटना, लॉन्च मालक संघटना, वाडे एक्शन समिती व इतरांचा समावेश आहे. मुरगाव बचाव अभियान स्थापन करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे मुरगाव बंदर प्राधिकरणाला सादर करण्यात आल्याची माहिती अभियानाचे प्रवक्ते सायमन पेरेरा यांनी दिली व तीन दिवसांच्या आत यावर लक्ष घालण्यास न आल्यास त्यांना रस्त्यावर उतरण्याची पाळी येणार असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आल्याचे पेरेरा यांनी सांगितले. निवेदन देऊन तीन दिवस पूर्ण (आज मध्यरात्री) होत असले तरी एमपीटीकडून थोडीही हालचाल न झाल्याने आज मध्यरात्रीपासून गोव्यातील समुद्रात होणारा सर्व व्यवसाय बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून अभियानात असलेल्या सर्व संघटनांनी त्यास मान्यता दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे आमच्या अभियानाला वास्कोतील मच्छिमार्केटातील विक्रेत्यांनी, भाजी विक्रेत्यांनी व येथील दुकान मालकांनी पाठिंबा दर्शविला असून 100 टक्के वास्को बंद राहण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुरगाव बचाव अभियानातर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात मुरगाव पोर्ट ट्रस्टने कोळसा हाताळणे पूर्णपणे बंद करावे, सडा हार्बर येथे असलेल्या (1922) खुर्साला हात न लावणे, वाडे येथे मच्छिमारी जेटी न होणे तसेच इतर काही मागण्या ठेवलेल्या असून सर्व मागण्या पूर्ण न होईपर्यंत मुरगाव बचाव अभियान गप्प बसणार नसल्याचे सायमन यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले. आज संध्याकाळी या विषयावर अधिक माहिती घेण्यासाठी खारीवाडा मच्छिमारी जेटीवर भेट घेतली असता सुमारे 350 हून अधिक मच्छिमारी नौका येथे काळे झेंडे लटकावून उभ्या ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तसेच मच्छिव्यवसायात असलेल्या वाहनांना काळे झेंडे लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे वास्कोतील मच्छिमार्केट, भाजी मार्केट व इतर दुकाने बंदात सहभागी होणार असल्याचे त्यांच्याशी संपर्क केला असता सांगण्यात आले.
या विषयावर अखिल गोवा मच्छिमारी बोट मालक संघटनेचे अध्यक्ष रोनी डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता आज रात्री 12 पासून बंदला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वास्कोवासीयांना सतावत असलेले कोळसा प्रदूषण व आमच्यावर केले जाणारे अत्याचार जोपर्यंत थांबत नाहीत व आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुरगाव बचाव अभियान मागे सरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. खारीवाडा (वास्कोतील) येतील 350 मच्छिमारी नौका, बेतुल येथील 150 मच्छिमारी नौका तसेच इतर भागातील सुमारे अन्य 100 मच्छिमारी नौका त्याचबरोबर 160 बार्जेस व 35 लॉन्चेसनी आपला व्यवसाय बंद केल्याचे रोनी यांनी सांगून सकाळपर्यंत बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, आज उशिरा संध्याकाळी खारीवाडा जेटीवर या अभियानाच्या काही सदस्यांकडून गुप्त बैठक घेण्यात आली असून मुरगाव बंदरातील होणारा व्यवसाय बंद टाकण्याचे त्यांच्याकडून ठरविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून कोळसा घेऊन जाणारे ट्रक व इतर (कोळसा घेऊन जाणारी) वाहने रोखण्यात येणार असल्याचे सांगितले. सोमवारी होणाऱ्या या बंदामधून तणापूर्वक वातावरण होण्याची एकंदरीत भीती वास्कोवासियांमध्ये व्यक्त केली जात असल्याने जास्तीत जास्त दुकाने तसेच शहरातील बस सेवा बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments: