Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 11 February, 2008

डच्चू मिळणारा मंत्री कोण?आज घोषणा
सत्ताधारी पक्षात वादळ घोंगावतेय!
पणजी, दि. 10 (प्रतिनिधी) - "कोणाला मंत्रिमंडळातून वगळावे याची आम्ही अद्याप चर्चा करत असून उद्या सकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत डच्चू देण्यात येणाऱ्या विद्यमान मंत्र्यांचे नाव जाहीर करतील, असे निवेदन कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक बी.के.हरिप्रसाद यांनी आज गोव्यातील नेत्यांच्या बैठका घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले. त्यामुळे दिगंबर कामत यांचे आठ महिन्यांचे सरकार वाचवण्यासाठी बळी जाणाऱ्याचे नाव उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. परवाच गोव्यात येऊन समन्वय समितीची बैठक घेतलेले पक्षाचे निरीक्षक बी.के. हरिप्रसाद काल संध्याकाळी पुन्हा गोव्यात दाखल झाले आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री कामत, प्रदेश अध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन व अन्य नेत्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत वीज मंत्री आलेक्स सिक्वेरा व नगर विकास मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या नावाचा विचार झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यातील एका नावावर उद्या सकाळी शिक्कामोर्तब होणार आहे. दुसऱ्या बाजूने लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या, अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या गटाने कॉंग्रेसवर दबाव घालण्यास सुरुवात केली आहे.
दोघेही आलेमाव बंधू मंत्रिमंडळात असल्याने ज्योकीम आलेमाव यांना त्याग करणे भाग पडणार आहे. त्यांनी तसे न केल्यास वीज मंत्री म्हणून आलेक्स सिक्वेरा हे असमर्थ ठरल्याचे कारण पुढे करून त्यांच्यावर मंत्रिपदाचा त्याग करण्यासाठी दबाव टाकला जाणार आहे.
उद्यापर्यंत एकाला वगळून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेण्याची सर्व तयारी झाली झाली आहे. श्री. ढवळीकर यांना सामावून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सध्याच्या घडामोडीनुसार श्री. ढवळीकर यांना घ्यायचे जवळजवळ निश्चित झाल्याने गृहमंत्री रवी नाईक यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच ढवळीकरांच्या आगमनाने राणेंचा गट शक्तिशाली होणार असल्याने अर्थ मंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांचीही चलबिचल सुरू झाली आहे. उद्या कॉंग्रेसच्या मंत्र्याला डच्चू दिल्यानंतर नेतृत्व बदलाची मागणी जोर धरेल, असे चित्र आहे. ऍड. नार्वेकर व श्री. नाईक यांनी त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिगंबर कामत यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.

No comments: