Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 February, 2008

ज्येष्ठ मानवतावादी समाजसेवक
डॉ.बाबा आमटे यांचे देहावसान

नागपूर, दि. 9 - अंातरराष्ट्रीय ख्यातीचे, ख्यातनाम मानवतावादी समाजसेवक पद्मविभूषण डॉ.मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचे आज पहाटे 4.15च्या सुमारास त्यांचे कर्मभूमी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवन येथे दु:खद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 94 वर्षाचे होते. गत 6 महिन्यांपासून ते रक्ताच्या कर्करोगाने आजारी होते.
बाबांच्यामागे त्यांच्या पत्नी साधना आमटे, दोन मुले डॉ. प्रकाश व डॉ. विकास, मुलगी रेणुका, सुना, जावई, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
गेल्या ऑगस्टमध्येच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नागपुरातील अवंती नर्सिंग होममध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यावेळीच रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर आपल्या आयुष्याचे यशाचे दिवस आनंदवनातच काढायचे आहे, असा आग्रह बाबांनी धरल्यामुळे त्यांना आनंदवनात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे निकटवर्ती डॉ. पोळ त्यांच्यावर इलाज करीत होते. काल रात्रीतून त्यांच्या प्रकृतीने गंभीर वळण घेतले आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यावेळी डॉ. पोळ, बाबा आमटेंचे जावई विलास मनोहर हे त्यांच्याजवळ होते.
बाबांच्या निधनाची बातमी आनंदवन परिसरात लगेचच पसरली आणि शोकाकुल आनंदवनवासियांनी त्यांच्या कक्षाकडे धाव घेतली. वरोरा, चंद्रपूर आणि नागपुरहुनही त्यांचे अनेक सुहृद आनंदवनकडे धावले.बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आणि सुन डॉ. मंदा हे सध्या बाहेरगावी आहेत तर बाबांची नात म्हणजेच डॉ. विकास आमटेंची मुलगी शीतल ही श्रीलंकेत आहे. ही सर्व मंडळी आज रात्री उशीरापर्यंत पोहचत असून उद्या सकाळी बाबा आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवन परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती डॉ. विकास आमटे यांनी दिली.

बाबा आमटे यांच्या निधनामुळे एक कर्मठ समाजसेवक अस्तंगत झाला असून स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर पिढ्यांना जोडणारा एक दुवा निखळला आहे. डॉ. बाबा आमटे यांनी बरेच समाजप्रबोधनाचे लेखन केले असून त्यांचे "करूणेचा कलाम' हे पुस्तक तसेच "ज्वाला आणि फुले' हा काव्यसंग्रह बराच गाजला आहे.

No comments: