Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 February, 2011

‘क्रूझ’ व्यावसायिकांचाही कायद्याला ठेंगा

३८ पैकी एकाकडेही प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता नाही
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता न घेताच ‘एमपीटी’ने पर्यावरण संरक्षण कायद्याचे तीन तेरा वाजवण्याचे उदाहरण ताजे असतानाच राज्यातील क्रूझ बोटींचा व्यवसायही अनधिकृतपणेच सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विचारलेल्या एका तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिलेल्या लेखी माहितीत या व्यावसायिकांकडून जल व वायू कायद्याची मान्यता मिळवली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात एकीकडे बेकायदा खाण उद्योगामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी सुरू आहे. खाण उद्योगाला रान मोकळे करून दिलेल्या सरकारकडून अन्य बाबतींतही पर्यावरण संरक्षण कायद्याची फजितीच सुरू असल्याचे उघड झाले आहे. राज्यातील विविध नद्यांत एकूण ३८ क्रूझ बोटी असल्याची माहिती बंदर कप्तान खात्याकडून मिळाली आहे. या सर्व व्यावसायिकांना जल व वायू कायद्याअंतर्गत ना हरकत दाखला मंडळाकडून मिळवणे सक्तीचे आहे. या कायद्याची पूर्तता न करताच गेली कित्येक वर्षे हा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे. या बोटींकडून सर्व कचरा व मैला संबंधित नदीतच सोडला जातो. हा प्रकार विधानसभेतील काही आमदारांनी नजरेस आणून दिल्यानंतरच आत्ता कुठे प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले आहे. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी नदीत कार्यरत असलेल्या एकूण १२ क्रूझ व्यावसायिकांना यासंबंधी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत व या सर्व कायद्यांची पूर्तता करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
पर्यटन खात्याकडूनच उल्लंघन
दरम्यान, मांडवी नदीत कार्यरत असलेल्या सांता मोनिका व शांतादुर्गा या दोन्ही पर्यटन खात्याच्या क्रूझ बोटींनाही प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता नसल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही बोटींकडून मांडवी नदीत मैला सोडला जातो, असे खुद्द पर्यावरणमंत्र्यांनीच मान्य केले आहे. पर्यावरण खात्याकडून यासंबंधी पर्यटन खात्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. पर्यटन खात्याने तात्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता मिळवण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या मांडवी नदीत - ३२, साळ नदीत - ३, शापोरा नदीत - २ व जुवारी नदीत -१ अशा क्रूझ बोटी सुरू आहेत. दरम्यान, यांपैकी बहुतांश बोटींकडून सगळा मैला नदीत सोडला जात असल्याची तक्रार आली आहे. काहीजणांकडून हा मैला उचलला जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र तो मैला नदीतच सोडण्यात येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या व्यवसायामुळे नद्यांतील प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे व त्याचा थेट परिणाम समुद्रातील जैविक सृष्टीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बोटींकडून रात्री उशिरा कर्णकर्कश संगीत वाजवले जाते. त्याने नदीकिनारच्या भागांतील स्थानिकांना त्याचा बराच त्रास होतो. याप्रकरणी तात्काळ तपासणी करून संबंधित अधिकारिणीकडे अहवाल सादर करण्यात येईल, अशी हमी आता पर्यावरणमंत्र्यांनी दिली आहे.

No comments: