Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 February, 2011

छोट्या व्यवसायात मोठा आनंद मानणारे ज्ञानेश्‍वर मुळवी

• शैलेश तिवरेकर
पणजी, दि. १३
जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी त्याचे मूळ मात्र एकच असते, ते म्हणजे पैसा मिळवणे. पैसा म्हणजे जीवन नव्हे, हे खरे असले तरी जीवन जगण्यासाठी थोडाफार प्रमाणात तरी पैसा महत्त्वाचा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मग हा पैसा काही जण नोकरी करून तर काहीजण व्यवसाय करून कमावतात. व्यवसाय करून पैसा कमावणारे हे एकदम उच्चवर्गीय नसले तरी मध्यमवर्गीय जीवनाचा आनंद लुटतात. कोणताही व्यवसाय हा सुरुवातीला जरी खटाटोपाचा वाटला तरी एकदा त्या व्यवसायात जम बसला की मग ते चक्र सुरळीत चालू लागते असे म्हणतात. पण तो जम बसण्यासाठी आपल्या कामातील एकाग्रता आणि मेहनत आवश्यक आहे, कारण ‘कष्टे विना फळ नाही’.
सांतिनेझ येथे ‘भज्यांचा गाडा’ चालवून आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणारे ज्ञानेश्‍वर मुळवी हेही त्याच्यातीलच एक. आपला व्यवसाय छोटा का असेना परंतु तो आपला असून त्यांचा आपल्या कर्तृत्वावर विश्‍वास आहे.त्यांचे नाव जरी ज्ञानेश्वर मुळवी असले तरी ‘आमोणकर भज्यांचा गाडा’ म्हणून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे.
सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या नोकर्‍या केल्या परंतु कुठेही त्यांचे मन लागेना, शिवाय जे त्यांना मिळवायचे होते ते त्यांना मिळत नव्हते. म्हणून त्यांनी सांतिनेझ येथे ‘भज्यांचा गाडा’ सुरू केला. सुरुवातीला गाड्याचे भाडे त्यांना न परवडणारे होते परंतु त्यांनी हिंमत सोडली नाही आणि आज ते छोट्या व्यवसायात मोठा आनंद मिळवत आहेत. मिरची भजी, बटाट्यांची कापे, बटाटेवडा आणि उकडलेली अंडी हे त्यांच्या गाड्यावर मिळणारे पदार्थ. या पदार्थांची लोकांना जणू ‘रूच’ लागली आहे याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या हाताची असणारी अनोखी चव. कितीही गर्दी असली तरी ग्राहक वाट पाहत राहतात, हे त्यांच्या व्यवसायाचे विशेष. मध्यंतराच्या काळात त्यांनी गृहविज्ञानामध्ये केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ‘खाद्यपदार्थ सुरक्षा’ (फुड सेफ्टी) या शिबिरात सहभागी होऊन खाद्यपदार्थ सुरक्षेबाबत खास प्रशिक्षण घेतले. हाताला अशी एक विशेष चव पाहिजे असते की ज्या चवीसाठीच ग्राहकांची पावले गाड्याकडे वळवतात आणि नेमके तेच सूत्र ज्ञानेश्‍वरांना सापडले. त्यामुळे संध्याकाळी साधारणतः ६ ते ९.३० वाजेपर्यंत त्यांच्या गाड्याकडे ग्राहकांची मोठ्या संख्येने गर्दी असते.
छोट्या व्यवसायातून मोठा आनंद मिळवणार्‍या त्यांच्या व्यवसायासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, छोट्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असणे जरी चांगले असले तरी सध्याच्या स्थितीत असा व्यवसाय नव्याने करणे मात्र महाकठीण आहे. कारण आज बाजारात प्रत्येक गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत. या सर्वांतून मार्ग काढून आपला व्यवसाय सांभाळताना नाकीनऊ येतात. मग तो साधा ‘भज्यांचा गाडा’ का असेना.
बाजारातील कांदे, बटाटे, मिरची, तेलाचे दर वाढतात म्हणून खाद्यपदार्थांचे दर वाढवायला गेलो तर ग्राहक कमी होण्यास सुरुवात होते. एका बाजूने बाजाराचे वाढते भाव आणि दुसर्‍या बाजूला पदार्थांचा दर्जा संभाळणे हे अगदी साधे सोपे नाही. त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अशा व्यावसायिकांना सरकार काही मदत करेल याचीही काही शाश्‍वती नाही. त्यामुळे जे आहे ते चांगले म्हणून गप्प राहण्यावाचून मार्ग नाही. अशा या मुळवी यांच्या ‘आमोणकरांच्या गाड्या’वरील विविध रुचकर पदार्थांचा दरवळ संपूर्ण पणजीभर पसरलेला आहे.

No comments: