Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 September, 2010

किनाऱ्यांच्या सफाईसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

तेलतवंगाची सरकारकडून गंभीर दखल
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): समुद्रातील मोठ्या प्रमाणात तेलतवंग पसरल्याने राज्यातील किनारे विद्रूप होण्याच्या घटनेची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. या घटनेचा मुंबईतील जहाज अपघाताशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देताना समुद्र किनारे साफ करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी दिली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबतीत पर्यटन खात्याला साहाय्य करणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही या घटनेची दखल घेऊन या घटनेमागचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी "नीरी' ची मदत घेण्याचे ठरवले आहे, अशी माहितीही यावेळी श्री. सिकेरा यांनी दिली.
पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा व पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत किनाऱ्यांची पाहणी केली. संपूर्ण किनारी भाग काळ्या डांबरसदृष्य गोळ्यांनी कालवंडल्याचेही त्यांच्या पाहणीत आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचे नमुने गोळा केले आहे. आज संध्याकाळी मंत्रालयात राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (एनआयओ) पथकाबरोबर बैठकीचेही आयोजन करून याविषयावर सखोल चर्चा करण्यात आली. "एनआयओ' कडून याबाबतीत राज्य सरकारला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन मिळाल्याचेही श्री. सिकेरा म्हणाले.
दरम्यान, किनाऱ्यांची सफाई करताना या तेलतवंगाची योग्य प्रक्रिया करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ घातक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेची निवड करणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, हा प्रकार गोव्यासह संपूर्ण कोकणपट्टीतील किनाऱ्यांवरही निर्माण होत असल्याने त्याची दखल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. तटरक्षक दल, नौदल व डी. जी. शिपिंग आदींची मदत घेऊन गेल्या ७२ तासांत खोल समुद्रात कुठली जहाजे होते, याची माहिती मिळवून या घटनेला कोण जबाबदार आहे, याचा शोध लावला जाणार आहे. गोव्याला हा प्रकार नवा नाही. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकार नियमित प्रमाणात होत असल्याने हवामानातील व समुद्रातील बदलत्या वातावरणानंतर अशा प्रकारचे तेलतवंग पसरण्याचे प्रकार घडले आहेत.
स्वच्छतेसाठी लागणार ७० तास
मडगाव, (प्रतिनिधी) : तेलतवंगामुळे काळेठिक्कर पडलेले कोलवा ते बाणावली दरम्यानचे समुद्र किनारे साफ करण्याचे काम सरकारने युद्धपातळीवर हाती घेतलेले असले तरी ते संपूर्णतः साफ होण्यास किमान ७० तास म्हणजेच तीन दिवस लागतील अशी माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली.
दक्षिण गोव्यातील कोलवा ते बाणावली या तेलतवंगामुळे विद्रूप झालेल्या किनारपट्टीची पाहणी केल्यावर ते बोलत होते. त्यांच्या समवेत पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटन संचालक स्वप्निल नाईक, विज्ञान तंत्रज्ञान संचालक मायकल फर्नांडिस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य यांच्यासमवेत जाऊन पाहणी केली. यावेळी वालंका आलेमांव याही त्यांच्या समवेत होत्या.
पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले की, सदर तेलतवंग नेमका कुठून व कसा आला त्याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी सदर गोळे एकत्रित करून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तो अहवाल येताच कारणे स्पष्ट होतील. परंतु सध्या खात्यासमोर आव्हान आहे ते लवकरात लवकर किनारे स्वच्छ करण्याचे व ते काम यापूर्वीच सुरू झाले आहे.
मुंबईत झालेल्या दोन जहाजांमधील टक्करीतून झालेल्या तेलगळतीचीच ही परिणती आहे की काय ते सांगणे शक्य नाही. कारण वाऱ्यांची दिशा उलटी आहे. त्यामुळे तो तेलतवंग गोव्याकडे येणे कठीण होते. पण सागरगामी बोटी जळालेले तेल समुद्रातच सोडतात व त्याचे असे तवंग किनारपट्टीकडे येणे नाकारता येत नाही असे सांगून सरकार लवकरात लवकर किनारे स्वच्छ करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. किनारपट्टीतील एकाही पंचायतीने या तवंगाबाबत सरकारला कळविले नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली व वालंकामुळे हा प्रकार सरकारच्या लक्षात आल्याचे स्पष्ट केले.

No comments: