Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 September, 2010

देशप्रभूंविरुद्ध चोवीस तासांत तक्रार दाखल करा

अन्यथा, कोरगाव खाणप्रकरणी
आमदार सोपटे यांचा इशारा

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): भाईड कोरगाव येथील बेकायदा खाणीचे मालक जितेंद्र देशप्रभू यांच्या विरोधात चोवीस तासांच्या आत पोलिस तक्रार दाखल झाली नाही तर या बेकायदा खनिज वाहतुकीमुळे येथील रस्त्यावर साचलेला चिखल थेट खाण खात्याच्या कार्यालयात आणून टाकला जाईल, असा गर्भित इशारा पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी दिला. देशप्रभू यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी भाषा करून खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर पेडणेवासीयांना खुळे बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बेकायदा खाण तात्काळ बंद झाली नाही तर हेच पेडणेवासीय त्यांच्या तोंडाला काळे फासण्यास कमी पडणार नाहीत, अशी तंबी यावेळी आमदार सोपटे यांनी दिली.
भाईड कोरगाव येथील बेकायदा खाणीबाबत खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी "गोवादूत'ला दिलेल्या माहितीमुळे या भागातील लोकांत संतापाची लाट उसळली आहे. येथील बेकायदा खाणीवरील खनिजाची रात्री अपरात्री वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळूनही याकडे कानाडोळा करणाऱ्या खाण खात्यालाच लक्ष्य बनवण्याचा निर्णय या भागातील संतप्त नागरिकांनी घेतला आहे. बेकायदा खाणींबाबत सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत खाण संचालक या नात्याने अरविंद लोलयेकर हे सदस्य आहेत. त्यांनी स्वतः या खाणीला भेट देऊन येथील दृश्य पाहिले आहे, पण त्याचवेळी या बेकायदा खाणीचे मालक जितेंद्र देशप्रभू यांच्या विरोधात पोलिस तक्रार का दाखल केली नाही, असा सवाल आमदार सोपटे यांनी यावेळी केला. अरविंद लोलयेकर यांच्यासारखे वरिष्ठ सरकारी अधिकारीही राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनून पोरकटपणाची भाषा करायला लागले तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी जनतेलाच पुढाकार घेणे भाग पडेल, असे स्पष्ट संकेत आमदार सोपटे यांनी दिले.
जितेंद्र देशप्रभू यांनी खाण खात्याकडे पाठवलेल्या पत्रात या ठिकाणी आंब्याची कलमे लावण्यासाठी खोदकाम करीत असल्याचे कारण दिले आहे, त्यावर खाण खाते गप्प बसले आहे.जनतेच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. बेकायदा खनिज उत्खनन करून खुलेआम खनिजाची वाहतूक होत असल्याचे डोळ्यांदेखत पाहत असलेल्या लोकांना अशी पोरकटपणाची वक्तव्ये ऐकावी लागली तर काय परिस्थिती होणार, असा प्रश्न यावेळी आमदार सोपटे यांनी केला. खाण संचालकांनी वातानुकूलित केबिनमध्ये बसून अशी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत. त्यांना खरोखरच जनतेची काळजी असेल आणि आपले खाते कशा पद्धतीने बेकायदा गोष्टींना आश्रय देते हे पाहावयाचे असेल तर त्यांनी स्वतः भाईड कोरगाव येथील खाणीची पाहणी करावी, असा सल्लाही यावेळी देण्यात आला. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी या बेकायदा खाणीबाबत संचालकांकडे अहवाल मागितला असून खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडेही ही तक्रार पोचल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: