Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 19 January, 2010

आता जुगारविरोधी चळवळीला पोलिसांच्या मार्गदर्शनाची गरज

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवादरम्यान आयोजित होणारा जुगार ही सामाजिक समस्या आहे व ती रोखण्यासाठी जनतेचे सहकार्य हवे, या पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व उत्तर गोवा अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्या आवाहनाचे "मांद्रे सिटीझन फोरम'ने जाहीर स्वागत केले आहे. मांद्रे येथे लवकरच जुगारविरोधी जनमत चळवळीचा एक भाग म्हणून एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात येईल व त्यात लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस महासंचालक किंवा पोलिस अधीक्षकांना आमंत्रित करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
सार्वजनिक ठिकाणी आयोजित होणाऱ्या जुगाराविरोधात सध्या पेडणे तालुक्यात "मांद्रे सिटीझन फोरम'तर्फे वैचारिक चळवळ सुरू करण्यात आली आहे. "फोरम'च्या वतीने तयार करण्यात आलेल्या निवेदनावर सध्या संपूर्ण तालुक्यात सह्यांची मोहीम उघडण्यात आली असून त्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. "गोवादूत'ने सातत्याने हा विषय लावून धरल्याने या भागातील जनतेतही आता जाहीरपणे जुगारविरोधी चर्चा सुरू झाली आहे व त्यामुळेच या चळवळीला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवात मांडण्यात येणाऱ्या जुगारात पोलिसांचाही हात असतो व त्यांचा या जुगारवाल्यांना पाठिंबा असतो, त्यामुळे जुगाराविरोधात पोलिसांना माहिती देणे म्हणजे जुगारवाल्यांच्या तोंडात सापडणे अशी येथील लोकांची भावना बनली आहे. हा अनिष्ट प्रकार रोखायचा असल्यास जनतेचे सहकार्य हवे, अशी जर पोलिस अपेक्षा करीत असतील तर त्यांनी पुढाकार घेऊन या जुगाराबाबतच्या चळवळीत भाग घ्यावा व जनतेच्या मनातील भीती दूर करण्यास मदत करावी, अशीही मागणी "फोरम'तर्फे करण्यात येईल.
पोलिसांना सहकार्य करावे म्हणजे जनतेने नक्की काय करावे, असा सवाल "फोरम'तर्फे करण्यात आला आहे. जुगारासंबंधी जर लोकांना माहिती द्यायची असेल तर त्यांनी कुणाकडे द्यावी? त्यांचे नाव गुपित ठेवून त्यांना संरक्षण देण्याची हमी पोलिस कसे देतील? याची खात्री लोकांना पटायला हवी, तेव्हाच लोक पुढे सरसावतील, असेही यावेळी सांगण्यात आले. पोलिस महासंचालक किंवा अधीक्षक खरोखरच प्रत्यक्ष इथे येऊन यासंबंधी लोकांना मार्गदर्शन करतील, तेव्हाच लोकांना पोलिसांबाबत विश्वास पटेल व खऱ्या अर्थाने लोक जुगाराविरोधात उघडपणे बाहेर येतील, अशी माहितीही "फोरम'तर्फे देण्यात आली आहे. येत्या आठवड्यात याबाबतचे अधिकृत पत्र पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षकांना सादर केले जाईल, असेही यावेळी सांगितले.

No comments: