Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 January, 2010

संपर्क, संघटन व संघर्षाच्या जोरावर सत्ता मिळवू - पार्सेकर

भाजप प्रदेशाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पार्सेकर बिनविरोध

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - संपर्क, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या आयोजनेनुसार पक्षाचे काम करीत सत्ता काबीज करुया, असा कानमंत्र आज भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. पक्षाच्या केंद्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष किरण महेश्वरी यांनी त्यांची अधिकृतपणे तीन वर्षाच्या कालावधीसाठी पक्षाध्यक्षपदी घोषणा केल्यानंतर ते उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मावळते अध्यक्ष तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, निवडणूक अधिकारी ऍड. नरेंद्र सावईकर, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष उल्हास अस्नोडकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष तथा आमदार रमेश तवडकर, आमदार दामोदर नाईक, फ्रान्सिस डिसोझा, मिलिंद नाईक, महिला मोर्चाच्या अध्यक्ष , युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश महात्मे तसेच अन्य नेते मंडळी उपस्थित होते.
"पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड होणे हे चित्र भारतीय जनता पक्ष सोडल्यास अन्य कोणत्याच पक्षात पाहायला मिळत नाही. गोव्यासारख्या एवढ्या छोट्या राज्यातही कोणतेच रुसवेफुगवे न होता अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली हा आदर्श घेण्यासारखा असून याची नोंद दिल्लीपर्यंत पोचवली जाणार आहे,'असे यावेळी दिल्लीतून खास निरीक्षक म्हणून उपस्थित राहिलेल्या सौ. किरण महेश्वरी यांनी बोलताना सांगितले. आजही गोव्याच्या तसेच देशाच्या जनतेला गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारची आठवण होते. यावर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि पदाधिकाऱ्याच्या कामाचे "ऑडिट' केले जाणार आहे. केवळ पद घेऊन शांत बसता येणार नाही. प्रत्येक कार्यकर्ता आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो तेव्हाच पक्ष पुढे जातो, असे सौ. महेश्वरी पुढे म्हणाल्या.

प्रवास तेथे निवास अशा पद्धतीने काम केले जाणार आहे. पक्षाला संघटनात्मक दृष्ट्या जास्तीजास्त सुदृढ करण्याची योजना आहे. भाजपचे जेथे आमदार नाहीत, तेथेही संपर्क करून सरकारच्या दुष्कृत्याच्या विरोधात संघर्ष उभा केला जाणार आहे, असे आश्वासन यावेळी श्री. पार्सेकर यांनी दिले. पैशाच्या जोरावर आम्ही कॉंग्रेसला लढा देऊ शकत नाही. त्याला सुदृढ संघटनेची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि प्रत्येक कामाला कार्यकर्ता दिला जाणार आहे. या संघटनेच्या आधारावर येणारी निवडणूक लढवली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संपर्क वाढवला तरच चमत्कार होऊ शकतो. आमचा मार्ग गोव्याला चांगल्या दिशेने न्यायचा आहे. हा मार्ग कठीण असला तरी, तो निश्ंिचत आहे. कॉंग्रेस सरकारने जी कार्यपद्धती अवलंबली आहे ते पाहिल्यास भाजपचे सरकार येईल यात कोणताही किंतू वाटत नाही, असे मत यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले. आताच्या राजकीय बजबजपुरीचा लाभ उठवत युती करून सरकार केले तरी ते कार्य करू शकणार नाही. आम्हाला सक्षम सरकार पाहिजे. सर्व सामान्यांसाठी काम करणारे सरकार पाहिजे. त्यासाठी सर्व शक्ती श्री. पार्सेकर यांच्या मागे लावून सक्षम सरकार स्थापन करुया, असे आवाहन श्री. पर्रीकर यांनी पुढे बोलताना केले.
प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन , धन खर्ची घालून पक्षाचे काम केले आहे. या देशाचे राजकारण काही लोकांनीच घाण केले आहे. त्यामुळे चांगले लोक या राजकारणात आणले पाहिजेत, असे मत यावेळी मावळते अध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. क्रिकेट सामन्यात २६ चेंडूत २६ धावा पाहिजे अशी स्थिती असते तशी काहीशी स्थिती आमची आहे. त्यामुळे थोडा जोर लावल्यास सरकार निश्चितपणे स्थापन करू, असा दावा यावेळी श्री. नाईक यांनी केला.
नुकतेच लागलेले ग्रहण हे कॉंग्रेस सरकारला वाईट जाणार आहे. पहिल्यावेळी श्री. पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखालीच भाजपचे सरकार सत्तेवर आले होते. पक्ष परमवैभवापर्यंत न्यायचा असेल तर सर्वांचे रुसवेफुगवे दूर करावे लागणार असल्याचे दामू नाईक बोलताना म्हणाले, तर, गोव्याचा मुख्यमंत्री हा केवळ मनोहर पर्रीकर व्हावा, असे सर्व गोवेकरांना वाटते. राष्ट्रीय स्तरावरही त्यांना मान्यता मिळाली असल्याचे यावेळी फ्रान्सिस डिसोझा म्हणाले.
पणजी येथील मराठा समाज सभागृहात झालेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पक्षाचे संघटनमंत्री अविनाश कोळी यांनी केले तर, आभार उल्हास अस्नोडकर यांनी मानले. शेवटी सामूहिक वंदे मात्रम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मोडतोडीत भाजपला स्वारस्य नाही
"मोडतोड' करून सरकार करण्यात भारतीय जनता पक्षाला स्वारस्य नाही. आम्ही लोकशाही मार्गानेच सरकार स्थापन करू. तसेच पुढच्या निवडणुकीपर्यंत पक्षाचे १४ ही आमदार एकसंध राहतील याची पूर्ण खात्री असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पार्सेकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. २५ मतदारसंघात आजी- माजी आमदार आहेत तर, ११ मतदारसंघांत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत या वर्षी ९० हजार सदस्यता झाली असून विश्वजित राणे आम्हाला आव्हान वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. त्यांच्या मतदारसंघात भाजपने चक्क दोन हजार नवे सदस्य नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: