Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 January, 2010

विद्यापीठ बनले राजकीय आखाडा!

राहुलनी आळवला 'राग' कॉंग्रेसचा
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): देशात कॉंग्रेसला पराजित करण्याची ताकद कोणत्याही पक्षात नाही. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष किंवा भाजप कॉंग्रेसला पराजित करू शकत नाही तर केवळ कॉंग्रेस पक्षच कॉंग्रेसला पराजित करतो. ही परिस्थितीच बदलणे हेच खरे कॉंग्रेससमोरील मोठे आव्हान आहे, असे सांगत कॉंग्रेसचे महासचिव तथा युवा नेते राहुल गांधी यांनी आपल्या तथाकथित अराजकीय भेटीतही गोवा विद्यापीठाला थेट राजकीय व्यासपीठ बनवले. या थेट राजकीय भाषणामुळे राहुल गांधी यांची ही भेट बिगर राजकीय असल्याचे सांगत असलेल्या गोवा विद्यापीठाची मात्र पुरती फजिती झाली. कॉंग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष आहे व त्यामुळे जास्तीत जास्त गरिबांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा व कॉंग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोचवा, असे आवेशपूर्ण आवाहनही त्यांनी यावेळी केले. परिणामी गोवा विद्यापीठ आता एका गंभीर राजकीय वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहुल गांधी यांची गोवा भेट ही निव्वळ गोंधळ व सुरक्षेवर करण्यात आलेल्या लाखो रुपयांचा चुराडाच ठरली. नियोजनातील बट्याबोळ व त्यात कॉंग्रेसप्रणीत "एनएसयुआय' या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचा अजेंडा, यामुळे गोवा विद्यापीठ संकुलाचा वापर कॉंग्रेसकडून थेट राजकीय कारणासाठी करण्यात आला. शिक्षणाचे पवित्र स्थान म्हणून पाहिले जात असलेल्या गोवा विद्यापीठाला आज कॉंग्रेसच्या छावणीचेच स्वरूप प्राप्त झाले होते.
देशात प्रत्येक ठिकाणी भेट देऊन कोणत्या ना कोणत्या वादात सापडण्याची सवय जडलेल्या राहुल गांधी यांची गोवा भेटही वादग्रस्त ठरली आहे. कॉंग्रेसप्रणीत "एनएसयुआय' या विद्यार्थी संघटनेची निवड मतदानाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व त्यानिमित्ताने गोव्यात सध्या ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानिमित्ताने राहुल गांधी यांनी गोवा विद्यापीठ तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीला विद्यापीठातर्फे सर्व महाविद्यालयांना त्यासंबंधीचे अधिकृत पत्र पाठवून विद्यार्थ्यांना पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते; पण भाजप विद्यार्थी विभागाने आक्षेप घेत व विद्यापीठाचा वापर राजकीय हेतूसाठी करण्यास बंदी असल्याचे लक्षात आणून दिल्यावर हे परिपत्रकही मागे घेण्यात आले.
आज सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात आला. विद्यापीठाने पाठवलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना खास बसेस करून इथे आणले होते पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना परत फिरावे लागले. या एकूण प्रकाराबद्दल शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमंत्रण देऊन अपमान करण्याचाच हा प्रकार असल्याचे या ठिकाणी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. सुमारे तीस ते चाळीस बसेस राज्यभरातून आणण्यात आल्या होत्या व त्यामुळे दोन ते अडीच हजार विद्यार्थी हात हालवत परत गेले. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या या कार्यक्रमाला पत्रकारांनाही पूर्णपणे मज्जाव करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संवादात्मक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी राज्यातील कॉंग्रेस सरकारच्या बेशिस्त व बेफिकीरपणाचा पाढाच वाचल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हे दाखल झालेले सरकारात मंत्री कसे काय, असा सवालही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या एका तासाच्या कार्यक्रमानंतर राहुल गांधी विद्यापीठ परिषदगृहात आले व तिथे त्यांनी प्रदेश युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना निव्वळ पाच ते दहा मिनिटे मार्गदर्शन केले. तिथेही पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. तदनंतर पुन्हा विद्यापीठ मैदानावर प्रदेश कॉंग्रेस व युवा कॉंग्रेससाठी जाहीर कार्यक्रम ठेवण्यात आला व तिथेही पत्रकारांना प्रवेश दिला नाही.
--------------------------------------------------------------------
'एनएसयुआय' चे काम पाहण्यासाठीच आलो
गोवा विद्यापीठाकडून एकीकडे राहुल गांधी यांची भेट राजकीय नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरू होता पण आज खुद्द राहुल गांधी यांनी पत्रकारांशी केवळ एक मिनिटाचा संवाद साधून आपली भेट ही राजकीय हेतुपुरस्सर असल्याचे स्वतःच स्पष्ट केले. कॉंग्रेसप्रणीत "एनएसयुआय' संघटनेची मतदानाद्वारे निवड करण्याची पद्धत पहिल्यांदाच अवलंबण्यात आली आहे. गोव्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे व त्याची पाहणी करण्यासाठीच आपण आलो होतो, असे सांगून त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
--------------------------------------------------------------------
पणजी तंत्रनिकेतनचे राहुल प्रेम प्राचार्यांच्या उत्साहाला उधाण!
पणजी तंत्रनिकेतनचे प्राचार्य एल. आर. फर्नांडिस यांनी काल १८ रोजी आपल्या विद्यार्थ्यांना नोटीस जारी करून गोवा विद्यापीठात राहुल गांधी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाला भेट देण्याचा आदेशच जारी केला. या कार्यक्रमासाठी खास चार बसेसची सोय करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी आपली ओळखपत्रे सोबत न्यावी, असे आवाहन करून हा कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय आहे व राहुल गांधी हे शिक्षण व रोजगार या विषयांवर संवाद साधणार आहेत, असा निर्वाळाही सदर प्राचार्यांनी देऊन टाकला. प्रत्यक्षात या बसेस तिथे दिसल्या नाहीत पण विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राला त्याठिकाणी अजिबात किंमत नव्हती तर युवा कॉंग्रेसकडून काही ठरावीक विद्यार्थ्यांना "एनएसयुआय'चा पास व अर्ज दिला होता. त्या आधारावरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. प्राचार्यांनी हा आदेश कोणत्या आधारावर जारी केला हे माहीत नाही, असे स्पष्टीकरण तांत्रिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले.

No comments: