Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 January, 2010

बांद्यातील 'त्या' साठ्याचा संबंध मद्य घोटाळ्याशी?

सावंतवाडी व पणजी, दि. २० (प्रतिनिधी): राज्य अबकारी खात्यात बनावट दाखल्यांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात मद्याची आयात होत असल्याचे प्रकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उघडकीस आणून कोट्यवधींच्या मद्य घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. आता गोव्यातून अवैध पद्धतीने मद्याचा साठा घेऊन कोल्हापूरमार्गे वाहतूक करणारा टेम्पो काल बांदा पोलिसांनी अत्यंत शिताफीने पकडल्याने या घोटाळ्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
गोव्यात उत्पादित मद्यावर वेगवेगळ्या बड्या कंपन्यांचे लेबल लावून ते मद्य कर्नाटक व आंध्र प्रदेशात विकले जाते, असा संशय बांदा पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी हस्तगत केलेल्या मद्याच्या बाटल्यांवर "एस. विरा बिसलरी मिनरल लिमिटेड' या कंपनीचे लेबल लावले आहे. या कंपनीचे अधिकार "डिस्ट्रील ब्रॅंड वॉटर बार' हैदराबाद यांना बहाल असल्याचेही लिहिले आहे. प्रत्यक्षात हे मद्य गोव्यातच तयार होते व बड्या कंपन्यांच्या लेबलखाली बनावट पद्धतीने तयार होऊन ते जादा दराने इतर ठिकाणी विकले जाते, असा पोलिसांचा कयास आहे.
गोव्यातून शेजारील महाराष्ट्रापाठोपाठ आता कर्नाटकातही मद्याची बेकायदा वाहतूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे व त्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस प्रयत्न करीत असले तरी गोवा पोलिस व अबकारी खात्याकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बांदा पोलिसांना चकवा देऊन मद्याचा टेम्पो पळवताना पोलिसांनी ताब्यात घेतलेला चालक दिनकर महालिंग पाटील याने न्यायालयात बांदा पोलिसांविरोधात जबर मारहाणीची तक्रार केली आहे, त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिनकर पाटील याला सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. बांदा पोलिस स्थानकाचे निरीक्षक दत्तात्रेय मुरादे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करताना टेम्पोचे मालक नसरूद्दीन शेख यांना गाठले. दरम्यान, नसरूद्दीन शेख यांनी हा टेम्पो यापूर्वीच २१ मार्च २००८ रोजी सांगली येथील संदीप अर्जुन आरगे याला विकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचाही पिच्छा पुरवत अखेर टेम्पो मालक संदीप आरगे (रा. सांगली) यालाही ताब्यात घेतले. उद्या २२ रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. दरम्यान, गोव्यातून कायदेशीररीत्या आंध्र प्रदेश येथे मद्य पाठवले जात नाही, अशी माहिती मिळाली आहे. पण "बॅगपाइपर' ब्रॅंडचे हे बनावट मद्य आंध्र प्रदेशात पाठवले जाणार होते, असे त्या खोक्यांवर लिहिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले.
इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर परवा (ता. १८) रात्री थरारक पाठलागानंतर पोलिसांना दारूने भरलेल्या टेम्पोत सुमारे ६ लाख ३८ हजारांचे गोवा बनावटीचे मद्य सापडले होते. टेम्पोच्या मागच्या हौदात खास कप्पे बनवून त्यात "बॅगपाइपर' कंपनीचे लेबल असलेल्या दारूच्या बाटल्यांचे सुमारे १९० खोके ठेवले होते. तपासणी नाक्यावर तपासणीसाठी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना चकवत टेम्पोचालक दिनकर महालिंग पाटील याने गाडी वेगात पळविण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला इन्सुली घाटीत ताब्यात घेतले. यापूर्वी गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहेच पण आता मात्र या दारू वाहतूक करणाऱ्या टोळक्याने महाराष्ट्रमार्गे कर्नाटकातही आपले पाय पसरल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे.

No comments: