Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 May, 2009

यंदाही मुलींचा वरचष्मा, बारावीचा निकाल ८२.५५ टक्के

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च व एप्रिल महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात सलग दोन वर्षे दणका देत यंदाही मुलींनी बाजी मारली. बारावीचा एकूण निकाल ८२.५५ टक्के लागला आहे.
राज्यात विज्ञान शाखेत लियान हेलन डिमेलो (दामोदर विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, कोंब मडगाव), वाणिज्य शाखेत कल्पक दर्शन राव वालावलकर (रामकृष्ण महादेव साळगावकर उच्च माध्यमिक विद्यालय, मडगाव), कला शाखेत आश्विनी शेखर प्रियोळकर (श्रीमती नेली आगियार उच्च माध्यमिक विद्यालय) तर व्यावसायिक शाखेत गार्गी प्रसाद कामत (पीपल्स उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तालुकावार पेडणे केंद्राचा निकाल सर्वांत जास्त म्हणजेच ९३.४३ टक्के लागला तर, फोंडा केंद्राचा सर्वांत कमी म्हणजे ५६.१३ टक्के निकाल लागल्याची माहिती यावेळी गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष मेरव्हिन डिसोझा यांनी दिली.
बारावीचा निकाल २००७ साली ८०.३१ टक्के तर २००८ साली ७९. ३२ एवढा लागला होता. "एनसीईआरटी' अभ्यासक्रमामुळे यंदाच्या वर्षी निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली असल्याचे वैयक्तिक मत यावेळी श्री. डिसोझा यांनी व्यक्त केले. या वर्षी मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८२.१४ टक्के, तर मुलांचे प्रमाण ७४.३६ टक्के आहे. यामुळे मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारल्याचे दिसून आले. १३ केंद्रांतून घेतलेल्या या परीक्षेसाठी एकूण १२,११२ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९,९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेचा निकाल ७४.६१ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८२.७९ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ८३.२७ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ८२.५३ टक्के लागला आहे.
होली ट्रिनीटी उच्च माध्यमिक विद्यालय, बाणावली (व्यावसायिक व कला), सेंट थॉमस हळदोणा (कला), ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालय, अस्नोडा (कला), आवर लेडी ऑफ रोझरी, दोना पावला (वाणिज्य), श्री भूमिका माध्यमिक विद्यालय पर्ये (वाणिज्य), डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी (वाणिज्य), श्री दामोदर उच्च माध्यमिक विद्यालय मडगाव (विज्ञान), मुष्ठीफंड उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान), फा. बासिलीयो आंद्रे मेमोरियल उच्च माध्यमिक विद्यालय (व्यावसायिक) यांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
दरम्यान, ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण पडलेल्या विद्यार्थ्याला पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळत असून त्यासंबंधीचा अर्ज करण्यासाठी गोवा शालान्त मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वार्षिक उत्पन्न ४.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या उमेदवाराला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. पदवीसाठी दहा हजार तर, पदव्युत्तर शिक्षणासाठी २० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असल्याची माहिती यावेळी शालान्त मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.
उत्तर पत्रिकेच्या फोटो प्रतीसाठी शेवटची तारीख २६ मे तर फेरतपासणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १२ जून आहे. एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा २४ व २६ जून रोजी अनुक्रमे लेखी व प्रात्यक्षिक स्वरूपात घेतली जाणार आहे. म्हापसा व मडगाव अशा दोनच केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० जून, तर अतिरिक्त शुल्क भरून १२ जून पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments: