Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 15 May, 2009

महानंदला फासावर चढवा


संतप्त नागरिकांचा फोंड्यात मोर्चा


फोंडा, दि.१४ (प्रतिनिधी) - "सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याला फासावर चढवा', "महानंद नाईक याचा निषेध असो', "महानंद नाईक याची पत्नी पूजा हिला अटक करा', "महानंद नाईक याची कसून चौकशी करा'. फोंडा व आसपासच्या नागरिकांनी आज (दि.१४) संध्याकाळी दिलेल्या जोरदार घोषणांनी क्रूरकर्मा महानंदच्या विरोधात जनतेच्या मनात असलेल्या तीव्र संतापाची प्रचिती आली.
तरवळे ग्रामस्थांनी सीरियल किलर महानंद नाईक याचा निषेध करण्यासाठी आणि पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चात हजारो लोकांनी भाग घेतला. यावेळी मोर्चात सहभागी लोकांनी महानंद नाईक याला फासावर चढवा, महानंदची पत्नी पूजा नाईक हिला अटक करा अशा घोषणा दिल्या. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करणाऱ्या घोषणाही नागरिकांनी दिल्या. सीरियल किलर महानंद नाईक याच्या विरोधात लोकांत निर्माण झालेली चीड याद्वारे उघड झाली.
या मोर्चाला तिस्क फोंडा येथून सुरुवात करण्यात आली. फोंडा नगरपालिका, दादा वैद्य चौक, जुना बसस्थानक आदी भागातून हा मोर्चा फोंडा पोलिस स्थानकावर नेण्यात आला. पोलिस स्थानकासमोर पोलिसांनी मोर्चा अडवला, यानंतर मोर्चातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक शेराफीन डायस, निरीक्षक सी. एल. पाटील यांची भेट घेऊन महानंद नाईक प्रकरणासंबंधी चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने महानंद नाईक याची पत्नी पूजा नाईक हिला अटक करून तिची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणासंबंधी आणखी काही माहिती तिच्याकडून मिळू शकेल, असे पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. सीरियल किलर महानंद नाईक प्रकरणाचा पूर्ण छडा लागेपर्यंत फोंड्यात तपास कामात असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करू नये, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली.
महानंद नाईक याने केलेल्या युवतींच्या खुनाच्या प्रकरणाचे तपास काम प्राथमिक पातळीवर असून योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने सुरू आहे, असे पोलिस उपअधीक्षक शेराफीन डायस यांनी शिष्टमंडळाला सांगितले. महानंद नाईक याच्याकडून मिळणाऱ्या माहितीनुसार प्रकरणासंबंधी विविध पुरावे गोळा केले जात आहेत. तपास कामात कोणतेही कच्चे दुवे राहू नये म्हणून प्रयत्न सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात महानंद नाईक एकटाच गुंतलेला असल्याने गेली पंधरा वर्षे त्याचे हे कृत्य सुरू होते. याप्रकरणाच्या तपासात त्याची पत्नी किंवा अन्य कोणाचाही सहभाग आढळून आल्यास त्यालाही त्वरित अटक केली जाणार आहे, असे सांगण्यात आले. महानंद नाईक हा चलाख आहे. दोन ते तीन भेटीत युवतींना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम तो करत होता. एखाद्या युवतीसोबत कोणी ओळखीच्या व्यक्तीने पाहिले तर तो त्या युवतीशी पुन्हा संपर्क साधत नव्हता. तो नेहमी बसमधून प्रवास करत असे, त्याने फक्त निर्मला घाडी आणि तिच्या आईला वरच्या बाजारातून बसस्थानकावर आणून सोडले होते. महानंद कुठल्याही युवतीच्या घरी गेला नाही. बाजारात किंवा वाटेत युवतीला हाक मारत असे, दुसऱ्यावेळी तिच्याशी संभाषण करत असे आणि तिसऱ्या वेळी तिला आपल्यासोबत घेऊन जात असे. हाक मारूनसुद्धा त्याच्याकडे न पाहणाऱ्या युवतींच्या वाटेला तो कधी जात नसे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
या शिष्टमंडळात तरवळेचे पंच सदस्य फ्रान्सिस वाझ, माजी पंच सदस्य संदेश प्रभुदेसाई, प्रसाद शिरोडकर, विश्र्वास प्रभुदेसाई, तारा केरकर, माजी मंत्री विनय तेंडुलकर, हेमंत सामंत, ऍड. मनोहर आडपईकर, शिवसेनेचे उपराज्यप्रमुख नामदेव नाईक, दामू नाईक, दर्शना नाईकचे वडील तुकाराम नाईक, योगिताचे वडील, दीपालीची आई व इतरांचा समावेश होता. या मोर्चात तरवळे, शिरोडा, बोरी, कुर्टी, मडकई, बेतोडा, निरंकाल आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात महिलांची संख्यासुद्धा लक्षणीय होती. तसेच महानंद नाईक याने पळवून नेऊन खून केलेल्या काही युवतींचे कुटुंबीयसुद्धा सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या वतीने उपअधीक्षक शेराफीन डायस, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. येथील पोलिस स्थानकासमोर महानंद नाईक याच्या प्रतिमेचे दहन करण्यात आल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

No comments: