Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 May, 2009

गोव्यात कोण बाजी मारणार?

आज मतमोजणी, दुपारपर्यंत निकाल
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारसमोर विरोधी भाजपने जबरदस्त आव्हान निर्माण केल्याने या निकालाला विशेष महत्त्व आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांकडून विजय आपलाच असल्याचा दावा जरी केला जात असला तरी उद्या "हा सूर्य व हा जयंद्रथ' होणार आहे. उत्तरेतील मतमोजणी मिरामार येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयात तर दक्षिणेतील मतमोजणी गोविंद कारे कायदा महाविद्यालयात होईल. दुपारी १ वाजेपर्यंत गोव्यातील दोन्ही ठिकाणच्या नव्या खासदारांची घोषणा होईल, अशी अपेक्षा मुख्य निवडणूक अधिकारी अजित श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.
पंधराव्या लोकसभेसाठी एकूण पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या १६ रोजी होणार आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीप्रधान देशाच्या या निवडणूक निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. गोव्यातही यंदा दोन्ही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याने निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल, अशी माहिती श्री. श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली. उत्तरेत ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ख्रिस्तोफर फोन्सेको (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), जितेंद्र देशप्रभू (राष्ट्रवादी कॉंग्रेस), पांडुरंग राऊत (मगो) श्रीपाद नाईक (भाजप), उपेंद्र गावकर (शिवसेना) तसेच नरसिंह सूर्या साळगावकर व मार्था डिसोझा (अपक्ष) यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपचे श्रीपाद नाईक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र देशप्रभू यांच्यातच खरी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन (कॉंग्रेस), ऍड. नरेंद्र सावईकर (भाजप), ऍड. राजू मंगेशकर (भा.क.प), रोहिदास बोरकर ( सेव्ह गोवा फ्रंट) माथानी साल्ढाणा (युगोडेपा), जबाहर डायस, डेरीक डायस, फ्रान्सिस फर्नांडिस, मुल्ला सलीम, स्मिता साळुंखे आणि हमजा खान (अपक्ष) यांचा सहभाग आहे. याठिकाणी मात्र तिरंगी लढत अपेक्षित असून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासमोर भाजपचे ऍड. नरेंद्र सावईकर व युगोडेपाचे माथानी साल्ढाणा यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे.
मतमोजणीची सर्व व्यवस्था चोखपणे आखण्यात आली आहे. या काळात सुरक्षेच्याबाबतीतही कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उत्तर गोव्यासाठी २८० तर दक्षिणेसाठी २७८ पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केल्याने त्याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. निकालानंतर काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुकांमुळे गोंधळ माजू नये यासाठीही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. उत्तर गोव्यासाठी ९ मतमोजणी सभागृह तर दक्षिणेसाठी ७ सभागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या कामकाजाचे संपूर्ण छायाचित्रण करण्यात येईल. प्रत्येक मतदारसंघनिहाय मतमोजणी झाल्यानंतर केंद्राबाहेर असलेल्या फलकावर मतमोजणीचा आकडा दिला जाईल. त्याचबरोबर टप्याटप्यातील मतमोजणीची माहिती ध्वनीक्षेपकाव्दारे जाहीर केली जाईल. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही निकालाबाबतची माहिती टप्प्याटप्प्याने दिली जाईल. मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक विशेष नजर ठेवून असतील त्याचबरोबर अनेक सूक्ष्म निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत मिळून १०,१९,९७७ मतदारांची नोंदणी निवडणूक आयोगाने केली होती त्यातील ५,४३,४६२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तरेतील ४,८६,७८९ मतदारांपैकी २,७५,०४६ मतदारांनी भाग घेतला तर दक्षिणेतील ५,३३,१८८ पैकी एकूण २,६८,४१६ मतदारांनी आपले मतदान केले आहे. हे मतदान कुणाच्या पारड्यात झाले आहे याचा सोक्षमोक्ष उद्या निकालानंतर स्पष्ट होईल.

No comments: