Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 September, 2009

नंबरप्लेट सक्तीचीच !


वाहतूक खात्याच्या कोलांटीने राज्यात तीव्र संताप
भाजप प्रखर आंदोलन छेडणार

पणजी,दि.१९ (प्रतिनिधी)- "हायसिक्युरिटी नंबरप्लेट' सक्तीची करून वाहतूक खात्याने कोलांटी मारल्यामुळे राज्यभरात संतापाचा आगडोंब उसळला आहे. सरकारची ही भूमिका दुटप्पीपणा व खोटारडेपणाचा कळस आहे व त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील, असा इशारा विरोधी भारतीय जनता पक्ष तथा विविध वाहतुकदार व हायसिक्युरिटी नंबरप्लेटविरोधी संघटनांतर्फे देण्यात आला आहे.
हायसिक्युरिटी नंबरप्लेट ऐच्छिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. यासंदर्भात मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेऊ अशी घोषणा गेल्याच आठवड्यात वाहतूकमंत्र्यांनी केली होती. तथापि, आज अचानक या भूमिकेत बदल करून वाहतूक खात्यातर्फे आज वृत्तपत्रांतून जाहिरातीद्वारे "हायसिक्युरिटी नंबरप्लेट'च्या अंमलबजावणीचा कार्यक्रमच जाहीर करण्यात आला. त्यामुळे एकार्थाने नंबरप्लेटची सक्तीच करून टाकल्याने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या नंबरप्लेटची अंमलबजावणी सक्तीची करणार नाही, असे घोषित जरी केले असले तरी त्यांनी आपला निर्णय फिरवून आता वर्तमानपत्रांतून दिलेल्या जाहिरातीत अंमलबजावणीचा कार्यक्रमच जाहीर केला आहे. वाहतूकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे खुद्द मुख्यमंत्रीच अडचणीत आले आहेत. त्यांनी युवक कॉंग्रेस व वाहतुकदारांना दिलेल्या शब्दाला अर्थच उरलेला नाही. वाहतूकमंत्र्यांच्या या कृतीमुळे ते तोंडघशी पडली आहेत. आपल्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाला प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी विरोध केला होता.
सरकारने हा निर्णय स्थगित ठेवण्याची घोषणा केल्यानंतर विजयोत्सवही साजरा करण्यात आला होता; पण सरकारकडूनच हा निर्णय फिरवण्यात आल्याने प्रदेश कॉंग्रेस व युवा कॉंग्रेसचीही पूर्णपणे नाचक्की झाली आहे. वाहतूकदारांनी याबाबत मुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांना जाब विचारला असता त्यांनी याबाबत आपली असमर्थता व्यक्त केल्याचीही माहिती मिळाली आहे. यानिर्णयाविरोधात वाहतूकदारांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याच्या भूमिकेला त्यांनीही अप्रत्यक्षपणे मान्यता दिल्याची चर्चाही आज सुरू होती.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत हायसिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीचा पर्दाफाश केला होता. सर्वसामान्य लोकांवर आर्थिक ओझे लादणाऱ्या या जाचक निर्णयाविरोधात भाजपने सर्वप्रथम आंदोलन सुरू केल्यानंतर त्याचे लोण संपूर्ण राज्यभरात पसरले. या सरकार खोटारडेपणाने वागत असल्याचे या प्रकारावरून उघड झाल्याची प्रतिक्रिया भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी दिली. सरकारनेच नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंतही वाट पाहू न शकणाऱ्या सरकारवर या कंपनीचा एवढा दबाव आहे का, असा सवालही प्रा.पर्वतकर यांनी केला. या निर्णयाला विरोध करणारे वाहतूकदार व पेंटर यांना बरोबर घेऊन हे आंदोलन प्रखर करण्याबाबत भाजप लवकरच निर्णय घेईल, अ शी माहितीही त्यांनी दिली.
वाहतूकदारांनी याप्रकरणी पुकारलेल्या वाहतूक बंद आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिल्याने तोही यशस्वी झाला. काहीही केल्या सरकार आपल्या निर्णयाशी ठाम राहिल्याने वाहतूकदारांनी म्हापसा येथे जाहीर सभा घेतली व त्यानंतर मडगाव लोहिया मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले. मडगाव येथील जाहीर सभेमुळे हादरलेल्या मुख्यमंत्र्यांनी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना तात्काळ ही सक्ती स्थगित ठेवण्याची घोषणा पत्रकार परिषदेतून करण्याचे आदेश दिले व वाहतूकदारांना दूरध्वनीवरून तसा संदेश दिला. तसेच जाहीर सभा आटोपती घेण्याची विनंती केली. मडगाव येथे जाहीर सभेत सरकारच्या या निर्णयाची घोषणा करून फटाक्यांच्या आतषबाजीने वाहतूकदारांनीही विजयोत्सव साजरा केला. त्याला आठवडाही उलटला नाही तोच सरकारने आपला शब्द फिरवला. त्यामुळेच वाहतुकदार खवळले आहेत.
वाहतूकदारांची आज बैठक
उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेची रविवारी सर्वसाधारण सभा टी.बी.कुन्हा सभागृहात बोलावण्यात आली आहे. या सभेला संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहेच पण सरकारने हायसिक्युरिटी नंबरप्लेटबाबत फिरवलेल्या भूमिकेचा विषय या बैठकीत प्राधान्याने चर्चेस येणार आहे. ही माहिती सुदीप ताम्हणकर यांनी दिली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवूनच हे आंदोलन मागे घेण्यात आले; तथापि, हा एकूणच प्रकार धक्कादायक ठरला. या सरकारात मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला महत्त्व नसल्याचे दिसून आल्याने गोव्यातील जनतेचे हे दुर्भाग्य असल्याची कडवट प्रतिक्रिया वाहतुकदारांनी व्यक्त केली आहे.

No comments: