Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 September, 2009

मिकींच्या भवितव्याचा आज निर्णय


० कॅसिनो खंडणी प्रकरणी जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण
० गुन्हा अन्वेषण विभागाला हवेत मिकी-मॅथ्यू पोलिस कोठडीत


मडगाव, दि. २३(प्रतिनिधी): माजोर्डा येथील एका तारांकित हॉटेलमधील कॅसिनोतून खंडणी वसुली व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्या संदर्भात पर्यटनमंत्री मिकी पाशेको व या प्रकरणातील त्यांचे सहकारी असलेले मॅथ्यू दिनीज यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात उभय पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले. गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी मिकी यांना पोलिस कोठडीत घेणे आवश्यक असल्याची मागणी केली असून एकप्रकारे पर्यटनमंत्र्यांचे भवितव्य उद्याच्या निकालाअंती ठरणार आहे .
जिल्हा व सत्र न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता उद्या सकाळी उभयतांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निवाडा देणार आहेत. एकच प्रकरणाशी संबंधित हे अर्ज असल्याने त्यांची आज एकत्रित सुनावणी झाली. काल प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांच्यासमोर मॅथ्यू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीस आला असता त्यांनी हे एकच प्रकरण असल्याचे पाहून एकत्रित सुनावणीचा आदेश दिला होता.
आज पर्यटनमंत्र्यांतर्फे ऍड. श्रीकांत नायक, मॅथ्यू दिनीज यांच्यातर्फे ऍड. आनाक्लात व्हिएगश तर सरकारतर्फे ऍड. आशा आर्सेकर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही अर्जावर आपली बाजू मांडताना सरकारी वकिलांनी कॅसिनोंतील प्रकारांबाबत गुन्हा अन्वेषण विभागाकडे आवश्यक ते सर्व पुरावे असल्याचा दावा केला. गुन्हा अन्वेषण विभागाकडून तपास कामात विलंब झाल्याचे त्यांनी खंडन केले. कोलवा पोलिसांकडून गुन्हा अन्वेषण विभागाकडे तपास सुपूर्द करण्यासाठी जे सोपस्कार आवश्यक होते, त्यामुळे हा विलंब लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात कायद्याची कलमे अजामीनपात्र आहेत, आरोपी कॅसिनोंत विना परवाना घुसले, "आणखी खेळ नाही' असे जाहीर केल्यावर वाईट हेतूने पैशांची बॅग विजयी क्रमांकावर ठेवली व तेथील व्यवस्थापकाला रु.३.६९ लाख चुकते करण्यास भाग पाडल्याचे पुरावे आहेत. आरोपींना या प्रकरणात गोवले गेलेले नाही तर कॅसिनोंत असलेल्या सीसीटीव्हीत त्यांच्या कृतीचे चित्रण झालेले आहे असे त्यांनी सांगितले. कॅसिनो प्रवेशासाठी असलेले नियमही यावेळी वाचून दाखवण्यात आले.
एकाच प्रकरणात दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी तक्रारी नोंदविल्याचा आरोपींच्या वकिलांनी केलेल्या आरोपाचे खंडन करताना २९ मे व पुन्हा ३० व ३१ मे दरम्यानच्या रात्रीची अशी ही प्रकरणे असल्याचे सांगितले. खंडणी या शब्दाची त्यांनी व्याख्या स्पष्ट केली व कोणाला धमकावणे वा भय घालून पैसे नेणे ही कृतीही खंडणीतच मोडत असल्याचे सांगितले.
मिकी पाशेको यांच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. श्रीकांत नाईक यांनी गुन्हा अन्वेषण विभागाने मांडलेले एकूण एक मुद्दे खोडून काढले. खंडणी या शब्दावर भर दिला गेला आहे त्या शब्दाची नेमकी व्याख्या काय असा सवाल त्यांनी केला. अर्जदार ज्याअर्थी ३.६७ लाख एवढी रक्कम मागतो त्या अर्थी त्याचा तेथे व्यवहार सुरू आहे हेच सिद्ध होते. मग अशा या व्यवहाराला खंडणी कसे संबोधणार? अशी विचारणा त्यांनी केली. एवढी रक्कम कोणाकडे मागण्यात आली वा कोणाकडून नेण्यात आली ते स्पष्ट झालेले नाही, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
नोंद झालेला गुन्हा व तपासास झालेला विलंब हा आक्षेपार्ह आहे, गुन्हा अन्वेषण विभागाने चार महिने काय केले? असा सवाल त्यांनी केला. प्रत्यक्षात काहीच घडलेले नव्हते, सगळे कपोलकल्पित आहे, कोणत्याही आरोपाला पुरावा नाही, असे सांगून खंडणी वा धमकीचा प्रकार घडलेला असेल तर तेथील सीसीटीव्ही पुराव्यासाठी कोर्टात हजर केले जावेत, असे आव्हान त्यांनी दिले. कॅसिनोंतील कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी पोलिसात नोंदविलेली तक्रार या संदर्भात पुराव्यादाखल घेता येईल असे सांगताना हीच तक्रार मिकी निर्दोष असल्याचे दाखवून देत असल्याचे स्पष्ट केले.
मॅथ्यू यांच्या वतीने ऍड. आनाक्लात व्हिएगश यांनी युक्तिवाद करताना एकाच दिवशीच्या प्रकरणात दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून कोलवा पोलिसात तक्रारी नोंदविल्या गेल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या अशिलाला या प्रकरणात यापूर्वीच जामीन मिळालेला असताना त्याच कलमाखाली गुन्हा अन्वेषण विभाग पुन्हा गुन्हा नोंदवून त्यांची सतावणूक करीत असल्याचे ते म्हणाले. सरकारी वकिलांनी त्यांचा हा दावा यावेळी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत व आरोपीचे वकील म्हणतात तो गुन्हा २९ रोजी घडला होता व हे प्रकरण ३० व ३१ मे दरम्यानचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आजही गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोर्टात हजर होते. शिवाय कोर्टाबाहेर गोवा सशस्त्र पोलिसांची मिनिबस होती. मिकी वा मॅथ्यू दिनीज हे काही कोर्टात आले नव्हते.
नंतर आजच्या युक्तिवादाबद्दल ऍड. श्रीकांत नाईक यांनी पूर्ण समाधान व्यक्त केले व प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण कोणतेच भाष्य करीत नाही पण सदर गुन्हा नोंद करणे म्हणजे मिकीविरुद्धची खेळी आहे असे सांगितले.

No comments: