Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 September, 2009

तिघा मंत्र्यांनी माझ्याविरुद्ध कट रचला; मिकींचा आरोप

मडगाव, दि.२० (प्रतिनिधी) : आपणाविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यामागे राजकीय कारस्थान असून त्यात तीन ज्येष्ठ कॉंग्रेस मंत्री आहेत, असा स्पष्ट आरोप पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज येथे केला. तीन महिने उलटल्यानंतर या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यामागील कारण महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकात राष्ट्रवादीची बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.
अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेस पक्षावर व विशेषतः मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या संमतीखेरीज एवढे मोठे षडयंत्र रचणेच शक्य नाही. आपला या सरकारवर अजिबात विश्र्वास नाही. आपणास अटक झाली तर तिचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भवितव्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये यासाठीच आपण जामिनासाठी अर्ज केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका मंत्र्याला खंडणी वसुलीप्रकरणी अटक झाल्याचा दिंडोरा पिटणे व पक्षाला बदनाम करून त्याचा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत फायदा उपटायचा असे हे कारस्थान आहे. त्यासाठी धमकी देऊन, खंडणीरूपाने ३,६९,००० मागितले व जीवे मारण्याची धमकी दिली या कलमाखाली आपल्याविरोधात सीआयडीने गुन्हा नोंदवल्याचे त्यांनी सांगितले.
माजोर्डा येथील हॉटेलात आपण कॅसिनो खेळायला गेलो असता तेथून येणे असलेल्या पैशासाठी आपण तक्रार केली होती; तर आपल्याविरोधात माजोर्डा बीच रिसॉर्टमधील टेंजर्स कॅसिनोने गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. ही घटना ३० आणि ३१ मे २००९ दरम्यानची. त्यानंतर आपण कोणत्याही हॉटेलात कॅसिनो खेळायला गेलो नव्हतो. मांडवीच्या पात्रांतून आग्वाद पट्ट्याबाहेर कॅसिनो जहाजे हलवावीत हा निर्णय आपण नव्हे तर मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यात पुढाकार खुद्द मुख्यमंत्र्यांचा होता. त्या निर्णयाची आपल्या खात्याने फक्त कार्यवाही केली. तथापि, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याकडे आपण कॅसिनोेची सतावणूक करीत असल्याची तक्रार केली. हा निव्वळ राजकीय स्टंट आहे. दोन्ही आलेमाव बंधू व आपण एकत्र आल्यामुळे मुख्यमंत्र्यांची कोंडी झाली असावी, असा तर्क त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्धही न्यायालयात प्रकरणे चालू आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका काय, असा सवाल त्यांनी केला. आपली गोष्ट सोडा; पण कोर्टात एकही प्रकरण नाही अशांना बदनाम करण्याचे सत्रही काही कॉंग्रेस मंत्र्यांनी चालविले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले व त्याचेच आपणास वाईट वाटते, असे सांगितले.
३० मे रोजीच्या घटनेची कॅसिनोेचालकांनी ९ जून २००९ रोजी कोलवा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली होती. तथापि, आता गुन्हा अन्वेषण विभागाने कॅसिनो चालकांकडून आपण ३.६९ लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवून हे प्रकरण उकरून काढणे व आपणासह ११ जणांवर जीवे मारण्याची धमकी देणे तथा खंडणी वसूल करणारी दोन कलमे लावणे याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आपला न्यालयावर पूर्ण विश्वास असून तेथे आपणास न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

वरिष्ठ स्तरावर शिजला कट?
मडगावः खास गोटातून मिळालेल्या माहितीनुसार मिकी पाशेको यांना या प्रकरणात अडकवून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा हा कट वरिष्ठ स्तरावर शिजला होता. महाराष्ट्रातील काही वरिष्ठ नेते तेथील येत्या महिन्यातील विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादीशी युती करण्याच्या साफ विरोधात आहेत. त्यात तेथील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. त्यांची व गोव्यातील मुख्यमंत्र्यांची जीवा-भावाची मैत्री सर्वश्रूत आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला अशा प्रकारे बदनाम करून महाराष्ट्रात युतीच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे असा चंग त्यांनी बांधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिकी हे तर कामत यांच्यासाठी नेहमीची डोकेदुखी ठरले आहेत. कॅसिनोतील त्यांच्या दंगामस्तीच्या तक्रारीचा अशा प्रकारे वापर केला गेला तर एका दगडात दोन पक्षी मारले जातील असा बेत आखला गेला होता. प्रत्यक्षात त्यात गृहमंत्र्यांनी आपले हात धुऊन घेतले असेही सांगितले जाते. कॅसिनोप्रकरणी मध्यंतरी मिकी यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करून त्यांचा राग ओढवून घेतला होता. शिवाय मिकी -चर्चिल दोस्तीमुळे गृहमंत्री नाराज झाले होते. कारण चर्चिलशी त्यांचे आधीपासून राजकीय शत्रुत्व आहे. त्यामुळे त्यांनी पर्यटनमंत्र्यांवरील गुन्हा नोंद प्रकरणाला त्वरित मंजुरी देऊन आपला हेतू साध्य केल्याचे बोलले जाते. मात्र एक खरे की, विविध कारणास्तव मिकीवर डूख धरून असलेल्या शक्ती यावेळी एकत्र आल्याचे दिसून आले.

No comments: