Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 May, 2009

"गोवादूत'चा वर्धापनदिन ठरला एक पर्वणी!

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - "गोवादूत'चा वर्धापनदिन म्हणजे एक पर्वणीच. दिवस उजाडला तो विविधतेने नटलेल्या ४० पानी संग्राह्य विशेषांकाने तर दिवस मावळला तो अपूर्व अशा सुमधुर संगीत संध्येने. ही प्रतिक्रिया आहे "गोवादूत'संबंधी लोभ व्यक्त करण्यासाठी कार्यालयाला भेट दिलेल्या असंख्य हितचिंतकांची. अप्रतिम अशा एका शब्दात विशेषांकाची प्रशंसा सर्वांनीच केली. विश्वचरित्रकोशासारखा अवाढव्य उपक्रम हाती घेतलेले श्री. श्रीराम कामत यांनी तोंडभरून कौतुक करताना "एवढे उत्कृष्ट अंक कसे काय काढता बुवा' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करून "गोवादूत'ला दिलेली शाबासकीची थाप श्रमाचे फळ देऊन गेली.
सकाळी मुख्यालयात आयोजित श्रीसत्यनारायण महापूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी राजकारण्यापासून सामान्य वाचकांनी रांग लावली होती. रात्रीपर्यंत कार्यालयाला भेट देऊन वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि अन्य हितचिंतकांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. "गोवादूत'चे जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर यांनी सपत्नीक श्रीसत्यनारायणपूजेचे यजमानपद स्वीकारले होते. कर्मचारी आणि इतरांनी आपला सहभाग देत भजनाचा कार्यक्रम रंगविला. प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांनी प्रथम येत राजकारण्यांमध्ये पहिला क्रमांक मिळविला. त्यानंतर दुपारी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर,दिलीप परूळेकर,महादेव नाईक,दामोदर नाईक, राजेश पाटणेकर, रमेश तवडकर,अनंत शेट, दयानंद मांद्रेकर,फ्रान्सिस डिसोझा, यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
संध्याकाळी आयोजित स्वागत समारंभाच्यावेळी वैष्णवी क्रिएशनस् मडगाव निर्मित "स्वरसंध्या' या सुगम संगीत मैफलीची सुरुवात अन्नपूर्णा साखरदांडे यांनी गायलेल्या सरस्वती स्तवनाने झाली. तिने गायिलेल्या "श्रावणात घननिळा बरसला', "त्या तिथे पलीकडे', "खंडे रायाच्या लग्नाला', "धिपाडी डिपांग' या गीतांना रसिकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. राजेश मडगावकर याच्या "देवाचीये द्वारी', "तू सप्त सुर माझे', "मन उधाण वाऱ्याचे' या गीतांनी कार्यक्रमात रंग भरला.
चारुता जोशी हिने सादर केलेल्या "स्वप्नातल्या कळयांनो', "चांदण्यात फिरताना', "मि वाऱ्याच्या वेगाने आले' तसेच, "जिवलगा कधी रे येशील तू' या गीतांनी या मैफलीला एका वेगळ्या उंचीवर नेले. गोमंतकाचे उदयोन्मुख नाट्यगीत व भक्तिगीत गायक सचिन तेली यांनी गायलेल्या ""जय शंकरा, "तारी मज आता', "श्री राम जय राम जय जय राम' या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे निवेदन गोविंद भगत यांनी केले. या मैफलीसाठी संगीत साथ विष्णू शिरोडकर(कीबोर्ड), रोहित बांदोडकर (तबला), प्रकाश आमोणकर (ऑक्टोपेड) व दत्तराज म्हाळशी (हार्मोनियम) यांनी केली.
वैष्णवी क्रिएशनच्या बाल नृत्यांगना अप्रवी कामत, रुथा पर्रीकर, वैष्णवी पै काकोडे व कुंती मकवाना यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली. या कार्यक्रमावेळीच "गोवादूत' छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना पंडित कमलाकर नाईक यांच्याहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत सौ.वंदना गुरूदास प्रभू(पहिले),निरीक्षा सुदिन पै काणे(दुसरे) व कु.अक्षय सावर्डेकर (तिसरे) हरित चंद्रहास तळपणकर व नवदीप जॉन आगियार यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.

No comments: