Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 19 May, 2009

लष्कराच्या हल्ल्यात प्रभाकरन् ठार, श्रीलंकेच्या लष्कराचा दावा, आज अधिकृत घोषणा

कोलंबो, दि. १८ : श्रीलंकेत स्वतंत्र तामिळ राज्याच्या मागणीसाठी अतिशय निर्दयपणे चळवळ चालविणारा लिट्टे प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन् आज श्रीलंका सैन्याने केलेल्या गोळीबारात ठार झाला. प्रभाकरनला ठार मारल्याचा दावा श्रीलंकेच्या लष्कराने केला आहे. त्यामुळे भारतालाही मोठाच दिलासा मिळाला आहे.
प्रभाकरन् ठार झाल्याने गेल्या ३० वर्षांपासून श्रीलंकेत सुरू असलेल्या युध्दावर आता पडदा पडला आहे. या संघर्षात आतापर्यंत ७० हजारांवर लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लिट्टेच्या या संघर्षात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह अनेक सिंहली तसेच तामिळ नेत्यांचा समावेश आहे.
यासंदर्भात श्रीलंका सैन्याच्या प्रवक्त्याने अधिक माहिती देताना सांगितले की, प्रभाकरन व त्याच्या सहकाऱ्यांना शेवटच्या टप्प्यात चारही बाजूंनी घेरलेले असताना प्रभाकरनने हा घेरा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीलंका सैन्याच्या विशेष पथकाने केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, ५४ वर्षीय प्रभाकरन आपल्या काही विश्वासू सहकाऱ्यांसह एक व्हॅन व एका ऍम्ब्युलन्समधून पळून जाण्याच्या तयारीत असताना मुल्लईतिवू येथे श्रीलंका सैन्यातील विशेष पथकाने या कारच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रभाकरनचा मुलगा चार्लस अँथोनी व प्रभाकरनचे अत्यंत विश्वासू असे प्रमुख तीन नेते पोट्टू अम्मान, सुसाई व नादेसान ठार झाले आहेत. असे असले तरी या बंडखोरांच्या प्रेतांच्या डीएनए चाचणीनंतरच श्रीलंका लष्कराकडून याची अधिक़ृत घोषणा केली जाईल. पोट्टू अम्मान हा लिट्टेच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख होता तर सुसाई समुद्री शाखेचा प्रमुख होता. असे असले तरी लिट्टे प्रमुख प्रभाकरनचे काय झाले यासंदर्भात मात्र अद्यापही उलटसुलट चर्चा सुरूच आहे.
दोन तासांच्या चकमकीनंतर प्रभाकरनचे शव व्हॅनमधून बाहेर काढण्यात आले व ओळखण्यात आले, असे हा प्रवक्ता म्हणाला. आम्ही प्रभाकरनला ठार मारले आहे, असे माझ्या सैन्य अधिकाऱ्यांनी मला सांगितल्याचे श्रीलंकेचे पंतप्रधान रत्नसारी विक्रमसिंघे यांनी म्हटले. लिट्टे प्रमुख प्रभाकरन ठार झाल्याचे वृत्त समजताच राजधानी कोलंबोसह देशात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. स्वतंत्र तामिळ राज्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून द. आशियात सुरू असलेला हा प्रदीर्घ असा सशस्त्र संघर्ष समाप्त झाला आहे.

No comments: