Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 May, 2009

"संपुआ'चा आश्चर्यकारक विजय

राजकीय धुरिणांचे अंदाज चुकले; "रालोआ'ला १६३ जागा

नवी दिल्ली, दि. १६ ः देशभर ज्याची प्रतीक्षा केली जात होती, ते लोकसभा निवडणूक निकाल सकाळपासून घोषित होऊ लागल्यानंतर अनेक राज्यांमधून आश्चर्यकारक निकाल आल्याने राजकीय निरीक्षकांचे अंदाज कोसळले. कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने २५८ पर्यंत मजल मारली आहे. बहुमतासाठी फार तर १२-१५ खासदार त्यांना इकडून-तिकडून घ्यावे लागतील. ते मिळवणे फारसे कठीण नसल्याने या विजयाबद्दल कॉंग्रेसने आनंद व्यक्त केला. डॉ. मनमोहनसिंग यांनाच पंतप्रधानपद देण्याचे त्या पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे आमच्या हाती सत्तेच्या चाव्या असतील, पुढचा पंतप्रधान आम्ही ठरवू,अशा गर्जना निवडणुकीपूर्वी करणारे नेते तोंडावर आपटले. भाजपला अपेक्षेप्रमाणे यश न लाभल्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्नही विरले आहे.
जवळपास सगळ्याच "एक्झिट पोल'मध्ये यूपीएला आघाडी मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण संपुआ २५० पर्यंत जाईल, एवढी कल्पना कुणालाच नव्हती. त्यामुळे सकाळी-सकाळी निकालाचा कल पाहून सगळेच चकित झाले. दिल्लीसारखे स्वतःचे गड कॉंग्रेसने राखलेच, पण बिहार, उत्तर प्रदेशमध्येही त्यांनी चांगलीच मुसंडी मारली. लालूप्रसाद-रामविलास जोडी असो किंवा समाजवादी पक्ष, सगळ्यांना डावलून जनतेने कॉंग्रेस नेतृत्त्वावर विश्वास दाखवला. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने डाव्यांचे वर्चस्व मोडीत काढत त्यांची दादागिरी संपवली.
महाराष्ट्रात "मनसे'चा कॉंग्रेसला चांगलाच फायदा झाला. १७ जागा जिंकून कॉंग्रेस राज्यातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीची फारशी ताकद न दिसल्याने शरद पवारांच्या पंतप्रधानपदाचा प्रश्नही आपोआपच निकाली निघला आहे. आता आठ-नऊ खासदारांच्या जोरावर पवार पंतप्रधानपद मागू शकत नाहीत. अन्य पक्षांनाही आता घोडेबाजाराला संधी उरलेली नाही.
लोकसभेत बहुमतासाठी २७२ जागा हव्यात. त्यापैकी २५० पर्यंत संपुआने आकडा गाठला आहे. त्यामुळे १० जनपथ वर सत्तास्थापनेची गणिते मांडायला सुरुवात झाली आहे.
"रालोआ'ची निराशा
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो आणि कॉंग्रेसचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया या पक्षाने व्यक्त केली आहे. इतक्या वाईट निकालाची अपेक्षा केली नव्हती, असे सांगून भाजपाध्यक्ष राजनाथसिंग यांनी आपली व्यथा बोलून दाखवली. रालोआ यावेळी फक्त १६० जागांपर्यंत पोहोचू शकणार आहे. त्यामुळे त्यांना आणखी पाच वर्षं वाट पाहण्याशिवाय काहीच गत्यंतर नाही.
तिसऱ्या आघाडीचीही आजच्या निकालात चांगलीच बिघाडी झाले आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या बाता मारणारी ही मंडळी १०० पर्यंतही मजल मारू शकलेली नाहीत. त्यामुळे आता ते विरोधात बसतात, की पुन्हा कॉंग्रेससमोर लोटांगण घालतात, ते दिसेलच. तोंडघशी पडलेली लालू आणि त्यांचे मित्रपक्ष काय करणार हे पाहणेही मजेशीर ठरणार आहे.
राहुलना कॅबिनेट मंत्रिपद
राहुल गांधी यांना नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट पद मिळणार हे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसला मिळालेल्या यशात राहुल गांधींनी देशभरात केलेल्या झंझावाती प्रचाराचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत राहुल गांधींनी माझ्या कॅबिनेटचे सदस्य व्हावे अशी इच्छा खुद्द पंतप्रधानांनीच व्यक्त केली आहे. कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी नव्या सरकारमध्ये सामील होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनियांना विचारला. त्यावर नवीन सरकारमध्ये राहुलची काय भूमिका असेल याचा निर्णय पंतप्रधानच घेतील असे सोनियांनी स्पष्ट केले. त्यावेळी पंतप्रधान डॉ. सिंग म्हणाले, राहुलने माझ्या कॅबिनेटमध्ये सामील व्हावे यासाठी मी मागेही प्रयत्न केले होते. आता नव्या कॅबिनेटमध्ये सामील होण्यासाठी मी त्याला राजी करण्याचा प्रयत्न करेन.
कॉंग्रेसला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दुपारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
मतमोजणी सुरू झाल्यावर कॉंग्रेस आघाडीची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट होताच सकाळपासूनच १०, जनपथसमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली होती. ढोलताशे, फटाक्यांची आतषबाजी थांबत नव्हती. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून कॉंग्रेस मुख्यालय असलेल्या २४, अकबर रोडचा रस्त्यावरची वाहतूक पोलिसांनी बंद केली होती.
सोनिया, डॉ.सिंग यांच्या प्रतिक्रिया
सोनिया गांधींची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील शेकडो पत्रकार सकाळपासूनच १०, जनपथसमोर ठाण मांडून होते. अखेर चार वाजता पंतप्रधान मनमोहन सिंग १०, जनपथवर आले. आणि सोनियांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले, देशाच्या नागरिकांनी त्यांचे मत अगदी स्पष्टपणे मांडले आहे. त्यांनी कॉंग्रेस पक्ष आणि सोनिया गांधीच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.
देशाला एक स्थिर, मजबूत आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये असलेले सरकार देण्यासाठी संपुआ वचनबद्ध असल्याचे पंतप्रधांनांनी यावेळी स्पष्ट केले.
देशाच्या विकासासाठी डाव्या पक्षांसमवेत सर्वच विरोधी पक्षांनी भूतकाळ विसरून एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. लोकांना त्यांच्या भल्याचे काय आहे ते चांगले माहित आहे असे सांगत कॉंग्रेसला विजयी केल्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मतदारांचे आभार मानले. २००४ साली आम्ही किमान समान कार्यक्रमात लोकांना जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आमचे कार्य लोकांना आवडले असे सोनिया म्हणाल्या.

No comments: