Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 May, 2009

तोतया पोलिसाला पणजीत अटक

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) : पोलिस असल्याची बतावणी करून दूरध्वनीद्वारे लुटणाऱ्या तोतया पोलिसाला आज पणजी पोलिसांनी गजाआड केले. या तोतया पोलिसाचे नाव आदिल अब्दुल शेख (वय २४ रा. सांत इनेज) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सांत इनेज येथे तो "टेलिफोन बूथ' चालवत असून त्याला भा.दं.स ३८५, ४१९ व ५०७ कलमांनुसार अटक करण्यात आली आहे.
पोलिस असल्याचे सांगून आदिल हा आपल्याकडे पाचशे रुपये व एक मोबाईल मागत असल्याची तक्रार सांताक्रुज येथे राहणाऱ्या अजिंक्य रजपूत (१९) याने दाखल केली होती. प्राप्त माहितीनुसार सहा महिन्यापूर्वी आदिल व अजिंक्य याची तोंडओळख झाली होती. त्यानंतर अजिंक्य याच्या मोबाईलवर दूरध्वनी यायला लागले. "मी पोलिस कंट्रोल रूममधून समीर बोलत असून उद्या सकाळी सांताक्रुज येथील "ए आर. बेकरी'त पाचशे रुपये आणून ठेव, नाही तर,तुला खोट्या तक्रारीखाली अटक करू,' अशी धमकावणी दिल्यानंतर घाबरलेल्या अजिंक्यने त्या बेकरीत जाऊन १ मे रोजी पाचशे रुपये ठेवले. त्यापूर्वी आदिलने त्या बेकरीत जाऊन एक तरुण याठिकाणी पाचशे रुपये आणून देणार असल्याची माहिती दिली होती. सायंकाळी येऊन त्याने ते पाचशे रुपये घेतले. मग १७ मे रोजी अजिंक्यला पुन्हा दूरध्वनी आला. यावेळी आदिलने मोबाईलची मागणी केली. हा मोबाईल सांत इनेज येथे एका नाविकाकडे आणून ठेवायला त्याला सांगण्यात आले. त्या नाविकाला आदिलने आधीच जाऊन एक तरुण याठिकाणी माझ्या नावाने मोबाईल ठेवणार असल्याचे सांगितले. मोबाईल मिळाल्यावर आदिलने अजिंक्यला दूरध्वनी करून आपल्या मागण्यांचा सपाटा सुरूच ठेवला. अखेर अजिंक्यने याची माहिती आपल्या वडिलांना दिली. त्याचे वडील या पोलिसाला शोधत पोलिस कंट्रोल रूमात पोहोचले. तेथील समीर नावाच्या पोलिसाकडे चौकशी केली असता आपण असे दूरध्वनी केले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
याची पोलिस स्थानकात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अजिंक्य याला येत असलेल्या दूरध्वनीची माहिती मिळवली असता, हे दूरध्वनी सांत इनेज येथील एका टेलिफोन बूथवरून येत असल्याचे उघड झाले. त्याबरोबर आदिल याला पोलिसांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तोतया पोलिस बनून लुटणारा हा तरुण खऱ्या पोलिसांच्या तावडीत सापडला. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक विजय चोडणकर करत आहेत.

No comments: