Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 May, 2009

डॉ.मनमोहनसिंग यांचा शुक्रवारी शपथविधी

संसदीय पक्षनेतेपदी एकमताने निवड
मंत्र्यांची नावे आजच्या बैठकीत ठरणार
सोनिया गांधी संसदीय पक्षाच्या अध्यक्ष
प्रणव मुखर्जी लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते
पंधराव्या लोकसभेचे सत्र २ जूनपासून
माणिकराव गावित हंगामी सभापती?

नवी दिल्ली, दि. १९ : कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज नवी दिल्ली येथे झाली. त्यात डॉ. मनमोहनसिंग यांची कॉंग्रेस संसदीय पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. नवे पंतप्रधान म्हणून ते शुक्रवारी शपथ घेणार आहेत. उद्या बुधवारी संपुआची बैठक होणार असून, त्यात मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणाऱ्या मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.
कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या आज झालेल्या बैठकीत कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून पुन्हा एकमताने निवड करण्यात आली. तर, लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून प्रणव मुखर्जी यांची निवड करण्यात आली.
लोकसभेचे पहिले सत्र २ जूनपासून
दरम्यान, पंधराव्या लोकसभेचे पहिले सत्र २ जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी नव्या सदस्यांना शपथ दिली जाईल आणि राष्ट्रपती प्रतिभा पाटील या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
याच सत्रात सभागृहातील एका ज्येष्ठ सदस्याची हंगामी सभापती म्हणून निवड केली जाणार आहे. हे सभापती मग सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीकडे लक्ष देतील. नवव्यांदा लोकसभेत पोहोचलेले कॉंग्रेसचे माणिकराव गावित यांची हंगामी सभापती म्हणून निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांना संसदीय कार्याचा २७ वर्षे आठ महिन्यांचा अनुभव आहे.
७५ वर्षीय गावित हे उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार या आदिवासींसाठी राखीव मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. केंद्रातील संपुआच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते.
गावित यांच्यानंतर १५ लोकसभेत जे अनुभवी नेते आहेत, त्यात माकपचे वासुदेव आचार्य(२७ वर्षे पाच महिने), कॉंग्रेसचे कमलनाथ(२६ वर्षे २ महिने) आणि कॉंग्रेसचेच विलास मुत्तेमवार(२४ वर्षे ११ महिने) यांचा समावेश आहे. प्रथेनुसार लोकसभेचे पहिले अधिवेशन हे अल्पकालीन असते. याच अधिवेशनात अर्थसंकल्प मांडायचा का, याबाबत नवे सरकार निर्णय घेऊ शकते.

No comments: