Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 22 May, 2009

ढवळीकरांना तातडीने मंत्रिमंडळातून काढा

कॉंग्रेस प्रवक्ते खलप यांची मागणी

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारचा घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून तातडीने डच्चू द्यावा,अशी मागणी माजी केंद्रीय कायदामंत्री तथा प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड.रमाकांत खलप यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत सुदिन व दीपक या ढवळीकर बंधूंनी स्वतःच्या मगो पक्षाचा घात केलाच; परंतु कॉंग्रेसविरोधातही त्यांनी काम केले,असा ठपकाही खलप यांनी ठेवला.
माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॉंग्रेस भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केला. यावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर व इतर पदाधिकारी हजर होते. कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी धाडसाने "एकला चलो रे' चा नारा लावला.उत्तर प्रदेशात "संपुआ'चे घटक असलेल्या प्रादेशिक पक्षांकडून कॉंग्रेसला वाकुल्या दाखवण्याचे प्रयत्न सुरू होताच त्यांनी या पक्षांशी काडीमोड घेतला व स्वबळावर उत्तर प्रदेशात २१ जागा मिळवल्या. गोव्यातही भविष्यात कॉंग्रेसला सत्ता शाबूत ठेवायची असेल तर सरकारला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसेतर नेत्यांच्या मतदारसंघात पक्षाने लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे ऍड.खलप म्हणाले.
सध्याच्या स्थितीत कॉंग्रेसला ढवळीकर बंधूंच्या कुबड्यांची अजिबात गरज नाही. हे दोघेही भाजपचे हस्तक या नात्याने राजकारणात वावरत आहेत,अशी खरपूस टीकाही ऍड.खलप यांनी केली. कॉंग्रेस पक्षाने सत्तरी,डिचोली,थिवी आदी भागांत आपली राजकीय पोकळी भरून काढावी व या भागात पुन्हा संघटनात्मक कार्याला प्रारंभ करावा. विरोधी भाजप मतदारसंघांसह सरकारला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसेतर मतदारसंघावरही नजर ठेवावी,असेही खलप म्हणाले.
मंत्रिमंडळ फेररचनेस मुख्यमंत्र्यांचा नकार
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरफार करण्याचा सध्याच्या स्थितीत प्रश्नच उद्भवत नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. केंद्रात कॉंग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाचा लाभ आता गोव्याला करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून विविध योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार,असे कामत म्हणाले. मंत्रिमंडळ फेररचनेबाबत सध्या ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत, त्यात तथ्य नसून आपण त्या दृष्टीने विचारच केला नसल्याचा खुलासा त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्याविरोधात पक्षविरोधी काम केल्याची कोणतीही तक्रार आली नाही, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याची गरजच काय,असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

No comments: