Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 May, 2009

डॉ. मनमोहनसिंग आणि १९ कॅबिनेट मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यात शपथविधी

आनंद शर्मा, हांडिक यांना बढती

नवी दिल्ली, दि. २२ - संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांनी आज दुसऱ्यांदा शपथ ग्रहण केली. राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये आयोजित या शानदार सोहळ्यात राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधानांसोबतच अन्य १९ मंत्र्यांनाही राष्ट्राधृयक्षांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
निर्धारित कार्यक्रमानुसार ठीक सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे आगमन झ्राले. राष्ट्रगीतानंतर डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव पुकारले जाताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. सहा वाजून ३५ मिनिटांनी डॉ. मनमोहनसिंग यांनी शपथ घेतली.
पंतप्रधानांसोबत तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या संपुआच्या दोनच नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ममता बॅनर्जी यांचे नाव शपथ घेण्यासाठी पुकारले जाताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून ममतांचे स्वागत केले. राष्ट्रपतींना ममतांनी अगदी वाकून नमस्कार केला.
या दोन मंत्र्यांव्यतिरिक्त प्रणव मुखर्जी, ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, गुलाम नबी आझाद, सुशीलकुमार शिंदे, एम. वीरप्पा मोईली, एस. जयपाल रेड्डी, कमल नाथ, वायलर रवी, श्रीमती मीरा कुमार, मुरली देवरा, कपिल सिब्बल, अंबिका सोनी, विजयकृष्ण हांडिक, आनंद शर्मा आणि सी. पी. जोशी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार, कमल नाथ आणि सी. पी. जोशी यांनी हिंदीतून शपथ घेतली. उर्वरित १७ मंत्र्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. एस. एम. कृष्णा यांचा या मंत्रिमंडळात नव्याने कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. गत मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले आनंद शर्मा आणि विजयकृष्ण हांडिक यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे. गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, आनंद शर्मा या राज्यसभा सदस्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून तीन कॅबिनेट मंत्री घेण्यात आले आहेत. त्यात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मुरली देवरा यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्याचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार असून त्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून ५० मंत्र्यांचा समावेश केला जाणार असल्याचे समजते. गेल्या मंत्रिमंडळात एकूण ७९ मंत्री होते. यावेळी ही संख्या ७० च्या आसपास असेल, असे कॉंग्रेस गोटातून सांगण्यात येत आहे.
दोन-तीन दिवसात खातेवाटप
कॅबिनेट मंत्र्यांचे खातेवाटप दोन-तीन दिवसात केले जाईल, अशी माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांना दिली.

No comments: