Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 May, 2009

सासष्टीत ५ मतदारसंघांत भाजपच्या मतांत वाढ

मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात जरी भाजपला पराभव पत्करावा लागलेला असला तरी त्याचे मिशन सालसेत काही प्रमाणात यशस्वी झाले असून एके काळी सासष्टीत अवघ्या दोन मतदारसंघांत असलेले त्या पक्षाचे वर्चस्व पाचवर गेल्याचे कालच्या मतमोजणी कोष्टकातून दिसून येत आहे. अर्थात फातोर्डा वा मडगाव सारखा मतदारसंघ वगळता त्याला स्वबळावर जरी विजय मिळविता येणार नसला तरी कॉंग्रेसमध्ये जर भाऊबंदकी माजली तर मात्र त्याचा लाभ या मतदारसंघांत भाजपला होऊ शकतो असेच कालच्या मतमोजणीचा आलेख दर्शवितो.
अर्थात सदर आलेखांतील बदलामागील कारणे अनेक आहेत व त्यातील प्रमुख कारण आहे ते मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे. मडगावातील कॉंग्रेस उमेदवाराची आघाडी घटून ती अवघ्या दीड हजारावर येण्याचे तेच कारण आहे. दिगंबर कामत यांनी ते भाजपात असताना आपला मतदारसंघ आपणाला भविष्यात सुरक्षित व्हावा हा दूरगामी विचार करून फातोर्डांतील प्रभाग क्र. १० हा भाजप मतदारांचे प्राबल्य असलेला भाग मडगावात समाविष्ट करून घेतला होता पण आज ते कॉंग्रेसमध्ये असल्याने त्यावेळची त्यांची क्लृप्ती आज त्यांच्या अंगलट आली आहे.
एकेकाळी त्यांचे उजवे हात गणले जाणारे एक उद्योजक सध्या त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. ऐन निवडणूक प्रचार काळात ते देशाबाहेर गेले व मतदानकाळात परतले त्यांनी कॉंग्रेसविरुध्द केलेले काम मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आघाडी कमी करती झाली आहे. मडगावात भाजपची मते वाढण्याचे ते एक प्रमुख कारण मानले जाते.
यावेळी कुडतरी, कुंकळ्ळी व नावेली मतदारसंघातील भाजपाची मते वाढण्यामागेही असेच फॅक्टर कारणीभूत आहेत. संपूर्ण घोगळ वसाहत परिसर कुडतरी मतदारसंघात घातला गेला व तेथील एकगठ्ठा भाजप मतदारांचा प्रभाव कुडतरीतील कौलावर पडला एरवी तेथे भाजप मतदार नगण्य होते, त्यातच कॉंग्रेमधील उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वितंवादाचा लाभ त्या पक्षाला झाला व त्याची मते वाढली.
नावेलीचा जो भाग बाणावलीत टाकला गेला आहे तो कॉंग्रेसवाल्यांचाच मानला जातो त्यामुळे बाणावलीतील कॉंग्रेस मतदार वाढले तर उलट नावेलीतील भाजप मतदारांचे वाढलेले प्रमाण यावेळी स्पष्टपणे जाणवून आले.
कुंकळ्ळीत जरी भाजप समर्थक उठून दिसत असले तरी त्यांच्या संख्येवर असलेली मर्यादा बाळ्ळी व आंबावली हा भाजप समर्थकांचा भाग कुंकळ्ळीत समाविष्ट केल्याने तेथील भाजपाची मतें वाढलेली आहेत पण त्यांची संख्या स्वबळावर विजय मिळविण्याइतकी नाही पण कॉंग्रेस दुभंगलेली असली व ते आपसात लढत राहिले तर त्यावेळी भाजपची सरशी होऊ शकते .
मात्र वेळ्ळी, बाणावली व नुवे या मतदारसंघांत भाजप आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. तसेच या तिन्ही मतदारसंघांनी काल पिछाडीवर गेलेले सार्दिन यांचे तारू सावरून त्यांना विजयाप्रत नेले असे दिसून आले. या एकंदर परामर्षावरून भाजपाने सासष्टीतील आपली उपस्थिती दोन वरून पाच विधानसभा मतदारसंघाप्रत नेली हे दिसून येते.

No comments: