Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 December, 2008

५० बुलेटप्रूफ जॅकेटस्ची गोवा पोलिसांची मागणी, 'एटीएस'च्या स्थापनेचा प्रस्ताव सरकारला सादर

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): दोन महिन्यापांसून पोलिस मुख्यालयात अडकून पडलेला "दहशतवादविरोधी पथक' (एटीएस)ची स्थापना करण्याचा प्रस्ताव सरकाराला पाठवून देण्यात आला असून येत्या काही दिवसांत या पथकाची स्थापना केली जाणार असल्याचे पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांनी सांगितले. त्यासाठी कमांडो पथकाकरता पन्नास "बुलेटप्रूफ' जॅकेटस्ची मागणीही करण्यात आली आहे.
कोणत्याही दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी गोवा पोलिस पूर्ण तयार होत असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने संपूर्ण तयारी करण्याचे आदेश गोवा पोलिसांना दिले आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत दिल्लीतून एक पथक गोवा पोलिसांची तयारी आणि सुरक्षेचा आढावा घेण्याकरता गोव्यात दाखल होणार आहेत. यासाठी "रेड अलर्ट' योजना सर्व पोलिस स्थानकात पाठवून देण्यात आली असून त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या योजनेत "रेर्ड अलर्ट' घोषित करताच पोलिसांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच कोठे नाकाबंदी करावी, पोलिस नियंत्रण कक्षाने कोणती जबाबदारी पार पाडावी, दहशतवादी हल्ला होताच किंवा होण्याची दाट शक्यता असताना कोणत्या अधिकाऱ्याला सर्वांत आधी माहिती द्यावी, याचा संपूर्ण तपशील या योजनेत देण्यात आला आहे. गोवा पोलिसांचा गुप्तहेर विभाग भक्कम करण्यासाठी दोघा पोलिस उपनिरीक्षकांना दिल्ली येथे केंद्रीय गुप्तचर विभागात प्रशिक्षणाकरता पाठवले जाणार असल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिस मुख्यालय आणि सचिवालयाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ओळख दाखविल्याशिवाय कोणालाही पोलिस मुख्यालयात आणि
सचिवालयात प्रवेश दिला जात नाही. त्याचप्रमाणे पणजी पोलिस स्थानकातून पोलिस मुख्यालयात जाण्यासाठी असलेली वाटही बंद करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्यांना मुख्यालयाच्या खाली एका वहीवर आपले नाव नोंदवायला लागते. त्यानंतर त्या व्यक्तीला पहिल्या मजल्यावर सोडले जाते.
पोलिस मुख्यालयात घेतल्या जाणारे निर्णयांबाबत पोलिस अधिकारी गुप्तता पाळत नसल्याने काल पोलिस महानिरीक्षक कुमार यांनी काही पोलिस अधीक्षकांना बरीच तंबी दिल्याची माहिती हाती आली आहे. अत्यंत गुप्त समजला जाणारी "रेड अलर्ट' योजनेची माहिती माध्यमांपर्यंत पोचल्यानेच ही तंबी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

No comments: