Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 December, 2008

बसला आग लागून ६३ जण मृत्युमुखी

फिरोजाबाद, दि. १० : फिरोजाबाद-शिकोहाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रुपसपूर गावाजवळ मंगळवारी रात्री भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृतकांची संख्या वाढली असून ती आता ६३ झाली आहे. सर्व मृतकांवर आज शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
मंगळवारी रात्री लागलेल्या या आगीत होरपळून ६० जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तिघांना हॉस्पिटलमध्ये भरती केले असता त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे या घटनेतील मृतकांची संख्या वाढून ६३ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमित गुप्ता यांनी दिली. एक­-दोघांचा अपवाद वगळता बसमधील सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की बसमध्ये असलेले महिला व लहान मुले बसल्या जागीच जळून त्यांची राख झाली. त्यांचे हाडाचे सापळेच तेवढे दिसून आले, त्यामुळे त्यांची ओळख पटविणेही मोठे कठीण झाले.
शवविच्छेदनाच्या वेळी शवविच्छेदन गृहाजवळ मृतकांच्या नातेवाईकांसह इतरही लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात बॅरिकेडस लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही आत प्रवेश नाकारण्यात आला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री विनोद सिंग यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या. अंत्यसंस्काराबाबतही त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना आणि संबंधितांना काही सूचना केल्या. उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी रात्रीच मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.
सपाचे कार्यवाहक अध्यक्ष शिवपाल सिंग यादव यांनीही आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केली.

No comments: