Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 December, 2008

"अल कायदा'चे गोव्यावर लक्ष

"रेड ऍलर्ट'साठी सज्जतेचा पोलिस स्थानकांना आदेश

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - गोव्यावर अल- कायदा या दहशतवादी संघटनेने आपले लक्ष केंद्रित केल्याचा इशारा गुप्तचर खात्याने राज्य सरकारला दिल्याने सर्व पोलिस स्थानकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच "रेड ऍलर्ट' घोषित करताच पोलिसांनी काय करायचे, कुठे सुरक्षा तैनात करावी, कोणती काळजी घ्यावी, याची यादीच सर्व पोलिस स्थानकांत पाठवल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
गेल्या आठवड्यात मुंबईत हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी जलमार्गाचा वापर केला. त्यामुळे गोवा सरकारने किनारी सुरक्षा व्यवस्थेवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे जलद प्रतिकार संघ "क्वीक रिस्पॉन्स टीम्स'(QRTs) स्थापना करण्यात आली आहे. या संघात दोन कमांडोज आणि स्थानिक पोलिसांचा समावेश असेल, त्यांच्याकडे पुरेशी हत्यारे उपलब्ध असतील, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी दिली.
गोव्याला "सॉफ्ट टार्गेट' म्हणून पाहिले जात असून, राज्यावर अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांची वक्रदृष्टी असल्याचे गुप्तहेर विभाग (आयबी)चे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गेल्या आठवड्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात गोव्याच्या १०५ कि.मी.च्या किनारी भागात नौदल, तटरक्षक दल , पोर्ट ट्रस्ट आणि गोवा मरिनच्या पोलिसांच्या सुरक्षाविषयक भूमिकेचा आढावा घेण्यात आला.
आम्ही आमच्या परीने गोव्यातील जनतेला पूर्ण सुरक्षा आणि संरक्षण देण्याचा प्रयत्न करत असून, इथल्या सर्व स्थळांना सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही श्री. गावकर यांनी सांगितले. स्थलांतरितांची पूर्ण माहिती मिळवण्यांसही पोलिसांनी सुरुवात केली असून, सर्व संशयितांना पोलिस स्थानकात बोलवून त्यांची कागदपत्रे आदी माहिती तपासली जात असल्याचे गावकर यांनी सांगितले. त्याशिवाय किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी पेट्रोलिंग करत असलेल्या "क्वीक रिस्पॉन्स टीम्स'च्या सदस्यांना दर तासाभरात जवळील पंचतारांकित हॉटेल्सचाही फेरफटका मारण्याच्या सूचना देण्यात आल्याचे गावकर यांनी सांगितले. ज्याठिकाणी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणांवर अधिक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असल्याचेही गावकर यांनी सांगितले.

No comments: