Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 December, 2008

"इफ्फी'चा असाही कडवट अनुभव !

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - गोव्यात नुकत्याच संपलेल्या ३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेला एक ब्राझिलियन चित्रपट निर्माता आणि परीक्षक यांना मुंबईच्या हॉटेलमध्ये अडवून ठेवले; कारण आयोजकांनी अद्याप त्यांच्या हॉटेल बिलांचा भरणाच केलेला नाही.
ब्राझिलियन चित्रपटनिर्माता हेल्डर डिकॉस्ता आणि फिलिपिनो चित्रपटनिर्माते तसेच "इफ्फी'चे एक परीक्षक असलेल्या लेव्ह दियाज यांना मुंबईच्या बावा इंटरनॅशनल हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ते विमानतळावर जाण्यासाठी निघाले असता अडवून ठेवल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. इफ्फीच्या आयोजकांनी त्यांच्या बिलांचा भरणा न केल्याने त्यांना अडवण्यात आले. त्यानंतर दियाज यांना २०० डॉलर्स भरून हॉटेल सोडावे लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. इफ्फी उरकल्यानंतर मुंबईमार्गे मायदेशी जाण्यासाठी हे दोघे निघाले होते.
गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव जे इफ्फीशी निगडीत व्यवहार हाताळत होते, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार असे घडावयास नको होते. हॉटेलचे कर्मचारी आणि प्रतिनिधी यांच्यातील गैरसमजामुळे हा गोंधळ झाला आहे. श्रीवास्तव यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण चौकशीअंती इफ्फीसाठी येणाऱ्या सदस्यांसाठी या हॉटेलची निवड करण्यात आली होती आणि त्यांच्याशी योग्य ती बोलणीही झाली होती. मुंबईच्या त्या हॉटेलची निवड केवळ ते सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ असल्याने करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी इफ्फीसाठी आलेल्या पाहुण्यांना अडवणे योग्य नव्हते. त्याऐवजी हॉटेलने थेट आमच्याशी संपर्क साधावयास हवा होता. त्यांनी आमच्याशी त्वरित संपर्क साधला असता तर जितक्या लवकर शक्य झाले असते तेवढ्या लवकर आम्ही त्यांच्या बिलांचे पैसे चुकते केले असते असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

No comments: