Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 December, 2008

पाकमध्ये करकरे "मसीहा' तर पुरोहित "गद्दार'!

रवींद्र दाणी
नवी दिल्ली, दि. ७ - पाकिस्तानचे जनमानस दोन मराठी माणसांभोवती फिरत आहे. एक आहेत एटीएसचे माजी प्रमुख स्व.हेमंत करकरे तर दुसरे नाव आहे लेफ्ट.कर्नल प्रसाद पुरोहित.
पाकिस्तानी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीवाहिन्या, लेखक, चिंतक या वर्तुळात करकरे यांचा उल्लेख मसीहा असा केला जात आहे. भारतीय लष्कराचा खरा चेहरा उघड करणारा निर्भिड अधिकारी या शब्दात करकरे यांचा उल्लेख केला जात आहे. पाकिस्तानमधील आज कोणतीही चर्चा मालेगाव व समझौता एक्सप्रेसमधील स्फोट यांचा संदर्भ दिल्या शिवाय पूर्ण होत नाही. आणि याचा संदर्भ देत असताना करकरे यांचा उल्लेख अतिशय आदराने केला जातो. काही पाक वृत्तपत्रांनी तर करकरे यांची सुनियोजित हत्या झाली असा आरोप केला आहे. मुंबई स्फोटांच्या आड, मालेगाव चौकशी रोखण्यासाठी करकरे यांची हत्या केली गेली असा अभिप्राय व्यक्त केला जात आहे. डॉन, द नेशन, फ्रंटीयर पोस्ट या वृत्तपत्रांनी करकरे यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. करकरे यांनी मालेगाव चौकशी तटस्थपणे केली आणि भारतीय लष्कराचा दहशतवादामधील सहभाग उघडकीस आणला असा अभिप्राय नोंदविला आहे. पाक विचारवंतांमध्येही करकरे यांना मानाचे स्थान मिळत आहे. पाकचे काही सेवानिवृत्त लष्करी अधिकारीही करकरे यांची प्रशंसा करीत आहेत. आय.एस.आय.चे माजी संचालक जनरल हमीद गुल यांनी करकरे यांचे नाव न घेता मालेगाव व समझौता एक्सप्रेस यांचा उल्लेख करून भारतातील दहशतवादी कारवाया या भारतातील अंतर्गत मामला आहे, असे जाहीरपणे म्हटले आहे.
लेफ्ट.कर्नल पुरोहित
लेफ्ट.कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या बद्दल मात्र पाकिस्तानात संतापाची लाट उसळली असून, त्यांना गद्दार म्हटले जात आहे. पाकिस्ताने पुरोहित यांची कस्टडी भारताकडे मागावी अशी जोरदार मागणी पाक प्रसारमाध्यमांकडून केली जात आहे. भारतीय लष्कर दहशतवादी घटनांमध्ये सहभागी आहे आणि याचा पुरावा म्हणजे प्रसाद पुरोहित यांना झालेली अटक असा सूर पाक वृत्तपत्रांमध्ये आढळून येत आहे. समझौता एक्सप्रेसमधील पाक नागरिकांच्या हत्येस पुरोहित जबाबदार असल्याने त्यांना तातडीने पाकच्या ताब्यात सोपवावे अशी मागणी पाकिस्तानात केली जात आहे.
१८ बळी घेणारा
पुरोहित यांनी काश्मीरमध्ये असताना १८ अतिरेक्यांना टिपले होते याचाही राग पाकमध्ये असून हे अतिरेकी नव्हते तर निष्पाप नागरिक होते, असे पाकमध्ये मानले जाते. पुरोहित यांना या गुन्ह्यासाठीही जाब विचारण्यात यावा अशी प्रतिक्रिया पाकिस्तानात व्यक्त होत आहे.

No comments: