Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 December, 2008

'कॉंबिंग ऑपरेशन'ला मोतीडोंगर अपवाद का?

'व्होटबॅंके'च्या धास्तीने नेत्यांची मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): 'सर्वांत प्रथम मोतीडोंगरावरील लोकांची झडती घ्या व मगच आमच्या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांची चौकशी करा,' असा स्पष्ट इशारा विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील काही नेत्यांनी पोलिसांना दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांच्या तसेच राज्यातील मूर्तितोडफोड तथा इतर गुन्हेगारी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या "कॉंबिंग'ऑपरेशनमुळे विविध राजकीय नेत्यांची पाचावर धारण बसली असून आपली "व्होटबॅंक'या कारवाईच्या निमित्ताने धोक्यात आल्याच्या शक्यतेने त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर कुरघोडीला सुरुवात केली आहे.
मुंबई येथे ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सुरक्षा यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.विविध ठिकाणी बेकायदा उभ्या राहिलेल्या झोपड्या तसेच संशयित ठिकाणी "कॉंबिंग ऑपरेशन'चे सत्र पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. कोणताही पत्ता किंवा ओळख नसलेले लोक या कारवाईत पोलिसांना आढळून आले असून त्यांची नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सध्या चिंबल, पर्वरी, कांदोळी, कळंगुट आदी भागांसह वास्को,मडगावतदेखील ही कारवाई सुरू आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेते या कारवाईमुळे धास्तावले आहेत. पोलिसांच्या या कृतीमुळे आपली "व्होटबॅंक' धोक्यात आल्याची चाहूल त्यांना लागल्याने त्यांच्याकडून पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करण्याचे धाडस या लोकांत नसल्याने त्यांनी सध्या पोलिसांना वेठीस धरले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर बिकट संकट उभे राहिल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे.
विविध ठिकाणी उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्या तसेच बिगर गोमंतकीय लोकांच्या वस्त्या या राजकीय नेत्यांच्या "व्होटबॅंक'असल्याने या कारवाईमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अनेकांनी याप्रकरणी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडेही तक्रार केल्याचेही कळते. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी या कारवाईत पोलिसांना मुक्तहस्त दिल्याने या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
मोतीडोंगराला मोकळीक का?
दरम्यान,मुख्यमंत्री कामत व गृहमंत्री रवी नाईक यांनी पोलिसांना कारवाई करण्याची मोकळीक दिली खरी परंतु त्यांची "व्होटबॅंक'असलेल्या ठिकाणी कॉंबिग ऑपरेशनला सूट का देण्यात आली आहे,असा सवाल काही नेत्यांनी करून पोलिसांना चांगलेच कैचीत पकडल्याचीही खबर आहे. फोंडा मतदारसंघातही असे अनेक अड्डे तथा वस्त्या असून तिथे अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. तलवारी प्रकरण तसेच मूर्तितोडफोड प्रकरणात मोतीडोंगरावरील संशयितांचा सुगावा पोलिसांना असतानाही या भागाला संरक्षण कोणत्या कारणास्तव देण्यात येत आहे,असा सवाल करून पोलिसांशी हुज्जत घालण्याचेही प्रकार सुरू असल्याची माहिती मिळते. त्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली आहे. आपल्याला नेहमी दबावाखाली वावरावे लागत असल्याची खंत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना खरोखरच राज्याच्या सुरक्षेची एवढी चिंता असेल तर त्यांनी सुरुवातीला मोतीडोंगर भागाची झडती घेण्याची मोकळीक पोलिसांना द्यावी व इतरांना धडा घालून द्यावा,अशी भूमिका या नेत्यांनी घेतल्याचे कळते.

No comments: