Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 December, 2008

येमेनी विद्यार्थ्यांची बैठक; पोलिसांकडून सारवासारव

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): दोनापावला येथील समुद्र किनाऱ्यावर काल पहाटे "येमेनी' विद्यार्थ्यांची तथाकथित सभा ही "ईद' उत्सवानिमित्तानेच असावी, अशी भूमिका आज पोलिसांनी घेत याप्रकरणी सारवासारव केली. अरब तथा आखाती राष्ट्रात "ईद' उत्सव आपल्या देशात साजरा होण्यापूर्वी एक दिवस अगोदर साजरा केला जातो,अशी माहिती यावेळी देण्यात आली. मात्र कालच्या सभेबाबत अनभिज्ञता व्यक्त करून या विद्यार्थ्यांची चौकशी केली जाईल, असे यावेळी पोलिसांनी सांगितले.
काल सकाळी पावणे सहा ते साडे सातच्या दरम्यान दोनापावला येथील हॉटेल "स्वीम सी' च्या मागे समुद्र किनाऱ्यावर सुमारे ५० ते ६० "येमेनी' विद्यार्थ्यांची एक सभा झाली. एका सभेत सदर विद्यार्थ्यांना एका धार्मिक मौलवीकडून संदेशही देण्यात आला. या सभेबाबतचे वृत्त दै."गोवादूत' मध्ये प्रसिद्ध झाल्यावर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. आज यासंबंधी पणजीचे पोलिस उपविभागीय अधिकारी सॅमी तावारीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बैठकीबाबत काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे सांगून गोव्यात वास्तव्यास असलेल्या "येमेनी' विद्यार्थ्यांची यापूर्वीच चौकशी सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, पोलिसांच्या खास शाखेचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या ठरावीक सभेबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. गोव्यात ईदपूर्व अशा सभा होतात अशी माहिती त्यांनी दिली. "येमेन' हा आखाती देश असल्याने त्यांची प्रार्थना अरबीतून होते. गोव्यात उर्दूचा वापर होत असल्याने अशा प्रार्थना सभा येथे घेण्याचे प्रकार घडतात,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, "येमेनी' विद्यार्थ्यांची चौकशी सुरू झाल्याची माहिती देत आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा कोणत्याही संशयास्पद कारवाईत सहभाग असल्याचे स्पष्ट झालेले नसल्याचे ते म्हणाले.
याप्रकरणी पोलिस कोणतीही तडजोड करण्यास तयार नसून त्यांच्या वास्तव्याची व्यवहार्यता व कायदेशीर प्रक्रियेचा तपास केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. गोव्यातील विविध खाजगी शैक्षणिक संस्था शिक्षण खात्याकडे नोंद नसल्याने त्यांच्या व्यवहारांकडे कुणाचेही लक्ष नसल्याचेही उघड झाले आहे. अशा विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थांची खात्याकडे नोंद असावी व या संस्थांकडून वेळोवेळी खात्याला माहिती उपलब्ध व्हावी,असा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आल्याचेही ते म्हणाले. सुरक्षेच्या बाबतीत नवे नियम व कायद्यांची फेररचना करण्याचीही गरज असून त्यादृष्टीने पोलिस खात्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments: