Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 December, 2008

बिथरलेल्या रेड्याच्या हल्ल्यात अग्निशमन अधिकारी जखमी

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - कांपाल येथील परेड मैदानावर बॅंडच्या आवाजाने आणि रंगीबेरंगी कपडे पाहून बिथरलेल्या रेड्याने आज सकाळी १९ डिसेंबरच्या परेडच्या सरावासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. हा धोका ओळखून अग्निशमन दलाचे निरीक्षक बॉस्को झेव्हियर यांनी त्या बेभान झालेल्या रेड्याला लगाम घालण्याचा प्रयत्न केला; तथापि त्या रेड्याने बॉस्को याच्या जांघेत शिंग खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना कांपाल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बॉस्को यांच्या प्रसंगावधानाने विद्यार्थ्यांना इजा पोहोचली नाही.
याविषयीची पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून रेड्याच्या मालकाला अटक केली आहे. १९ डिसेंबर या गोवा मुक्तिदिनानिमित्त आज सकाळी १०.३० वाजता विद्यार्थी, पोलिस व अग्निशमन दल यांचा परेडचा सराव सुरू होता. त्याचवेळी रस्त्यावरून जाणारा रेडा अचानक मैदानात घुसल्याने विद्यार्थ्यांची धांदल उडाली. रेडा विद्यार्थ्यांवरच चाल करून आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी बॉस्को झेव्हियर यांनी तातडीने रेड्याला आवरण्याचा प्रयत्न केला, त्यातच ते जखमी झाले. त्यानंतर रेडा निघून गेला. पोलिसांनी या रेड्याचा आणि त्याच्या मालकाचा शोध घेऊन हसन अहमद (रा. सांत इनेज पणजी) याच्यावर भा.द.स ३३६ व २८९ कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. याविषयीचा तपास निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक शाम आमोणकर करीत आहेत.

No comments: