Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 3 May, 2008

निरुक्ताच्या निकटवर्तीयांवर पोलिसांची नजर

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): आत्महत्येपूर्वी चार महिने अगोदर निरुक्ताच्या निकट असलेल्या व्यक्तींवर सीआयडीने (गुन्हा अन्वेषण विभागाने) आता जास्त लक्ष केंद्रित केले आहे. या व्यक्तींनाच अनेक गोष्टी माहिती असल्याची कुणकुण तपास अधिकाऱ्यांना लागली आहे. तसेच या प्रकरणी कोणालाही अधिक माहिती असल्यास ती तपास पथकाला उपलब्ध करावी, संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
निरुक्ताच्या गर्भाशय चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आहे. तथापि, तिच्या "डीएनए' चाचणीच्या अहवालाद्वारे अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो. काही दिवसापूर्वी "डीएनए' चाचणीसाठी निरुक्ताच्या गर्भाशयात संशयास्पद सापडलेल्या "टिश्यू'चे नमुने चाचणीसाठी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पोलिस सध्या त्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या हाती लागलेल्या "त्या' फोटोबद्दल फोंड्यात आज दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती. तो फोटो निरुक्ताचाच असल्याचा दावा काहींनी केला आहे. तसेच चार महिन्यापूर्वी निरुक्ताचे काही फोटो तिच्या वर्ग मैत्रणींना दाखवण्यात आले होते, त्या फोटोंचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. आत्महत्या करण्यासाठी निरुक्ता कोणच्या दबावाखाली आली होती, हे फोटो तर त्यास कारणीभूत नाही ना, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून निरुक्ताच्या कोणत्या व्यक्तींच्या घोळक्यात वावरत होती, याचाही शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments: