Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 30 April, 2008

'युपीए' सरकारकडून शिक्षणाचे विकृतीकरण आंदोलन आणखी तीव्र करणार

'अभाविप'चे अतुलभाई कोठारी यांचा इशारा
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): केंद्रातील "युपीए' सरकारने शिक्षण क्षेत्रात घातलेल्या गोंधळाविरोधात गेल्या साडेतीन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर "शिक्षण बचाव आंदोलना'तर्फे जोरदार आंदोलन सुरू असून ते अधिक तीव्र करण्याचा इशारा या "आंदोलना'चे सचिव तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय प्रचारक अतुलभाई कोठारी यांनी आज येथे दिला.
यासंदर्भात दक्षिण भारतातील परिस्थितीची आढावा घेतल्यावर गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्याच्याबरोबर परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. दत्ता भी. नाईक, प्रा. भूषण भावे व शिक्षा बचाव आंदोलना'चे गोवा प्रतिनिधी प्रा. अनिल सामंत उपस्थित होते. या आंदोलनाविषयीची गोव्यात एक बैठक झाली असून येत्या काही दिवसात त्याबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रात "युपीए' सरकार आल्यापासून शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करून भारताची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. देशाचे महापुरुष, धार्मिक नेते यांच्या विरोधात पाठ्यपुस्तकात विकृत लिखाण करण्यात आले. श्री राम, भगवान कृष्ण हे काल्पनिक असल्याचे त्याद्वारे मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झाला. देशाच्या क्रांतिकारी नेत्यांना "दहशतवादी' संबोधण्यात आले. जाट समुदाय लुटारू होते, आर्य बाहेरून आले, असा इतिहास शिकवण्याचा घाट या सरकारने घातल्याने हे आंदोलन छेडण्यात आल्याचे श्री. कोठारे म्हणाले.
इंदिरा गांधी खुल्या विद्यापीठाच्या "एम.ए'च्या अभ्यासक्रमात भगवान शंकर नग्न होते. मॉं दुर्गा मद्य प्राशन करून लढाईला जात असे, अशा प्रकारे देवतांचे विटंबना करणारा मजकूर छापण्यात आला होता. त्याविरोधात आंदोलन छेडून आठ दिवसांत हा मजकूर गाळण्यास भाग पाडण्यात आले होते. दिल्ली विद्यापीठातील एका पुस्तकाचे देशाची पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची कन्या डॉ. उपेन्द्रसिंग यांनी संकलन केलेल्या पुस्तकात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्याबद्दल विकृत गोष्टी पसरवणारा मजकूर छापण्यात आला असून त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संबंधितांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात १५ मार्च ०८ रोजी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती श्री. कोठारी यांनी दिली.
लैंगिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात तर अनेक आक्षेपार्ह गोष्टी असून ते विद्यार्थ्यांना "आरोग्य शिक्षण म्हणून दिले जावे, असे मत श्री. कोठारी यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना ते देण्यापूर्वी त्यांच्या पालकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. हा अभ्यासक्रम लागू करण्यापूर्वी त्यावर व्यापक चर्चा केली जावी, अशी मागणी विद्यार्थी परिषदेने केली आहे.

No comments: