Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 30 April, 2008

गोव्यातही 'खंडणी राज' पाच जणांच्या टोळीला रंगेहाथ अटक

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): खुनाच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला अट्टल गुंड आश्फाक बेंग्रे याच्या इशाऱ्यावर दहा हजार रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी गेलेल्या पाच जणांच्या टोळीाल आज पणजी पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. त्यामुळे गोव्यालाही आता मुंबईप्रमाणे "खंडणी राज'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याविषयीची तक्रार ताळगाव येथील दाऊद बादशहा यांनी पोलिस स्थानकात दाखल केली होती. पणजीतील अनेक व्यावसायिकांकडून खंडणी वसुली करण्याचा या टोळीचा बेत होता. यात आश्फाक बेंग्रे याचा मामा शब्बीर बेंग्रे (वय ४९ रा. नेरुल), दीपक केरकर (२१, रा. कालापूर), पॅट्रिक फर्नांडिस (१९ रा. मेरशी), योगेश नाईक (२२, रा. मेरशी) व सतेंद्र सिंग (२२, रा. गझियाबाद) यांना भारतीय दंड संहितेच्या ३८७ कलमाखाली अटक केली आहे. तसेच खंडणीसाठी वापरण्यात आलेली जीए०१ सी १५०१ या क्रमांकाची मारुती व्हॅन आणि त्या वाहनातील तीन मोठ्या सळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
आश्फाक बेंग्रे याला बगीरा याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहेत. याच ठिकाणी हे संशयित त्याच्या संपर्कात आले होते. आपला मामा शब्बीर बेंग्रे याच्या मदतीने ही खंडणी करावी, असा आदेश त्यांना देण्यात आला होता.
या संशयितामधील दीपक केरकर आणि योगेश नाईक यांची दोन दिवसापूर्वी अश्फाक बेंग्रेला जेथे ठेवण्यात आले आहे त्याच न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली होती. पणजी पोलिसांच्या ताब्यात आलेले या सर्व संशयितांनी यापूर्वी घरफोडी, वाहन चोरी प्रकरणात शिक्षा भोगली आहे. ही माहिती पणजी पोलिसांनी दिली.
या पाच जणांच्या टोळीने तांबडीमाती ताळगाव येथे दाऊद बादशहा या भंगार अड्डेवाल्यांकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीचे दहा हजार रुपये न दिल्यास घरातील मुलांना आणि पत्नीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याविषयी पोलिसांना कल्पना दिल्यानंतर काल रात्री आणि दिवसभर त्याठिकाणी सापळा रचण्यात आला होता. सायंकाळी पाचच्या दरम्यान ही टोळी वाहनातून खंडणीचे पैसे वसूल करण्यासाठी आले असता, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पणजी विभागाचे उपअधीक्षक देऊ बाणावलीकर व निरीक्षक फ्रान्सिसको कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक तुषार लोटलीकर, उपनिरीक्षक प्रज्योत फडते, पोलिस शिपाई शेखर आमोणकर आणि इरमय्या गुरय्या यांनी सहभाग घेतला.
----------------------------------------------------
तुरूंगात कट शिजला
पणजी शहरात खंडणी मागून त्याचा अर्धा भाग तुरुंगात असलेल्या आश्फाकपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा डाव होता. तो काही दिवसापूर्वी आश्फाक याने तुरुंगात आखला होता. त्याच्या कारवाईची जबाबदारी या संशयितांवर सोपवली होती, अशी माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे. ही माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
----------------------------------------------------

No comments: