Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 30 April, 2008

१५ लाखांचा मद्यसाठा जप्त; कुंकळ्ळीत छापा; दोघांची चौकशी सुरू

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): अबकारी खात्याच्या पथकाकडून आज दुपारी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत एका आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
कर्नाटक राज्यातील नियोजित विधानसभा निवडणुकीमुळे गोव्यातून मोठ्याप्रमाणात मद्याची तस्करी सुरू असल्याचा संशय खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाने केला होता. याप्रकरणी कर्नाटक तथा गोवा अबकारी आयुक्तालयाने गोवा कर्नाटक सीमेवर नाकाबंदी केल्याचे उदाहरण ताजे असताना आज घातलेला छापा महत्त्वाची प्राप्ती ठरली आहे. गोव्याचे अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील "व्ही. डी. पॅकेजर्स' या आस्थापनात बेकायदेशीर मद्यसाठा ट्रकातून नेला जात असल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याने अबकारी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी मद्यसाठा नेण्यासाठी तीन ट्रक सज्ज ठेवण्यात आले होते. या छाप्यात १५ खोके (मॅकडॉवेल ब्रॅंण्डी),६ खोके (ओल्ड मंक) व ३०० खोके (मॅकडॉवेल्स व्हिस्की) असा माल सापडला. त्यातील एका ट्रकात या मद्याच्या बाटल्यांवर लावण्यात येणारे लेबल, बाटल्यांचे खोके, बुचे तसेच "ओरीजिनल चॉईस',"ओल्ड मंक' आदींचे कर्नाटक व महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी तयार केलेले लेबल्सही सापडल्याने हा माल कर्नाटक किंवा महाराष्ट्रात नेण्याचा या लोकांचा डाव होता हे स्पष्ट झाले आहे.
अधिक माहितीनुसार या औद्योगिक आस्थापनात मद्याचा व्यवसाय केला जात असला तरी मद्य तयार करण्याचा परवाना अद्याप त्यांना मिळाला नसल्याची माहिती मिळाली आहे. सदर ट्रक हे हरयाणा नोंदणी क्रमांकाचे असून ते ताब्यात घेण्यात आले आहेत. अबकारी आयुक्तालयाने दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हे आस्थापन जेम्स ऍथोनी वाझ नामक व्यक्तीचे असल्याचे आढळून आले असून त्याबाबत चौकशी सुरू आहे.
या छापा सत्रात साहाय्यक अबकारी आयुक्त श्यामसुंदर परब,अबकारी अधीक्षक नवनाथ नाईक,निरीक्षक सतीश दिवकर, मिलाग्रीस सुवारिस आदींनी भाग घेतला.

No comments: