Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 8 May, 2010

चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई

नितीन गडकरींची पणजीत विराट सभा
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): कॉंग्रेस पक्षाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे व भ्रष्ट प्रशासनामुळे देश संकटात आहे. महागाई, आत्महत्या, बेरोजगारी व कायदा सुव्यवस्था आदी सर्व स्तरांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात बंगलादेशी घुसखोरांसाठी कॉंग्रेसने लाल गालिचाच पसरवला आहे. दहशतवादाचा संबंध थेट मतपेटीच्या राजकारणाशी करून कॉंग्रेसने देशाची सुरक्षाच डावाला लावली आहे. भ्रष्ट आणि दहशतवादाचे तुष्टीकरण करणाऱ्या कॉंग्रेसकडून जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल अनेक गैरसमज पसरवले आहेत. भाजप कोणतीच जात, पात, पंथ, भाषा इत्यादींच्या विरोधात नाही तर राष्ट्रद्रोहाच्या विरोधात आहे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन एकविसाव्या शतकात विकासाचे राजकारण हेच या पक्षाचे सूत्र राहणार आहे व त्या अनुषंगानेच हा देश जगातील पहिल्या क्रमांकाचा शक्तिशाली देश बनवणार, असा संकल्प भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रथमच दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेल्या नितीन गडकरींची आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेली आजची जाहीर सभा जबरदस्त यशस्वी ठरली. या सभेद्वारे राज्यातील भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांत एक नवा जोम व उत्साह फुंकण्यात त्यांनी यश मिळवले. गोव्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपले भाषण सुरू केलेल्या श्री. गडकरी यांनी प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले की, कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत आपला देश आतून व बाहेरूनही असुरक्षित बनला आहे. दहशतवादाचा संबंध थेट मतपेटीच्या राजकारणाशी करून कॉंग्रेस देशाच्या सुरक्षिततेकडेच तडजोड करत आहे. जनतेच्या मनात निर्माण केलेला गैरसमज दूर करण्यासाठी आता भाजपने पाच घटकांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, श्रमिक व पक्षाचे हितचिंतक या सर्वांना मुख्य प्रवाहात आणून विकासाभिमुख व वैभवशाली भारत निर्माण करण्याचा संकल्प या पक्षाने सोडला आहे. राष्ट्रप्रेमींच्या हाती बेड्या व राष्ट्रद्रोह्याला हार ही कॉंग्रेसची नीती बनली आहे. मुंबईवर हल्ला केलेल्या कसाबला फाशीची शिक्षा सुनावली गेली पण ती प्रत्यक्षात उतरेल काय, असा सवाल करून संसदेवर हल्ला केलेला अफझल गुरू हा कॉंग्रेसचा जावई लागतो म्हणून त्याला फाशी देण्यात येत नाही काय, असा संतप्त सवालही श्री. गडकरी यांनी केला. गुन्हेगारी, दहशतवाद व नक्षलवाद यामुळे देश पोखरला जात आहे व त्याचा सामना करण्याचे धाडस कॉंग्रेसमध्ये नाही. चीनकडून एका वर्षांत १४७ ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, सरकार मात्र केवळ उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ६२ वर्षे उलटली व सर्वाधिक सत्ता भोगलेल्या कॉंग्रेसच्या राजवटीत ४१ टक्क्यांनी दारिद्र्य वाढले. यांपैकी ७५ टक्के लोक हे अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक व इतर मागासवर्गीय आहेत. "गरिबी हटाव'चा नारा देऊन कॉंग्रेसने गरिबी वाढवली. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच महागाई वाढली आहे याचे पुरावे सादर करून या पक्षाने काळ्याबाजाराला उत्तेजन दिले व त्यातून कोट्यवधींचा मलिदा मिळवला, असा गंभीर आरोप श्री. गडकरी यांनी केला. देशात मद्यनिर्मिती उद्योगांना कवडीमोल दराने गहू व तांदूळ मिळतो पण ग्राहकांना मात्र हे धान्य मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले की, पुढील विधानसभा निवडणूक ही गोव्यासाठी एक महत्त्वाची घटना ठरणार आहे. सध्याच्या भ्रष्ट कॉंग्रेसच्या हाती सत्ता बहाल केल्यास आपल्या मुलांचे भवितव्य काय असेल, याचा विचार करूनच मतदारांना निर्णय घ्यावा लागणार आहे, असे ते म्हणाले. खासदार श्रीपाद नाईक म्हणाले की, गोव्याची ओळख असलेले राष्ट्रीय अध्यक्ष लाभल्याने त्याचा लाभ या प्रदेशाला निश्चितच होणार आहे. कॉंग्रेस सत्तेचा वापर केवळ पैशांसाठी करीत आहे. "सीबीआय'चा विरोधी नेत्यांमागे लावलेल्या ससेमिरा हा कॉंग्रेसच्या मुस्कटदाबी राजकारणाचा भाग आहे, असेही ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कॉंग्रेसने बेकायदा खाण व ड्रग्स इत्यादींमुळे राज्याची वाताहत केल्याचा आरोप केला. यावेळी इतर नेते, पदाधिकारी यांची भाषणे झाली. व्यासपीठावर पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निर्मला सीतारामन तसेच पक्षाचे सर्व आमदार, कार्यकारिणी पदाधिकारी हजर होते. आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर श्री. गडकरी यांनी सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. टी. बी. कुन्हा यांच्या समाधीला आदरांजली वाहिली व मग व्यासपीठावर आले.
-------------------------------------------------------------------
गोव्यात शिवशाही अवतरू द्या
गोव्यातील दलबदलू व भ्रष्ट कॉंग्रेसच्या राजवटीला जनता कंटाळली आहे. या प्रदेशात कॉंग्रेसकडून भाजपबद्दल अल्पसंख्याक व इतर लोकांत मोठ्या प्रमाणात गैरसमज व विष पेरले आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर या लोकांशी संवाद साधा व सर्वांना बरोबर घेऊन गोव्यात आदर्श व विकासाभिमुख राजवट द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वच्छ प्रशासनाची अजूनही लोक आठवण काढतात. गोव्याला प्रगतिशील व विकासाभिमुख सरकार देण्यासाठी जोमाने कामाला लागा व सर्वांच्या साथीने गोव्यात शिवशाही अवतरू द्या, असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.

No comments: