Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 5 May, 2010

'क्रूरकर्मा कसाबला फाशीच द्यावी'

उद्या निकाल
मुंबई, दि. ४ : मुंबईत हिंसाचाराचे थैमान घालून कित्येक लोकांचे जीव घेणाऱ्या क्रूरकर्मा कसाबला फाशीच द्यावी अशी आग्रही मागणी आज सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी शिक्षेसाठीच्या युक्तिवादात केली. कसाब हे माणसे मारण्याचे पाकिस्तानात उत्पादित झालेले यंत्र असून त्याला कुणाच्या जिवाची पर्वा नाही, अशा शब्दांत निकम यांनी कसाबच्या क्रूरकृत्याचे वर्णन केले. हा गुन्हा दुर्मिळात दुर्मीळ असल्याचे सांगून ते करणाऱ्या सैतानाला केवळ मृत्युदंडच दिला पाहिजे. कसाब हा सैतानाचा दूत आहे, अशा शब्दांत त्यांनी कसाबचे वाभाडे काढले.
विशेष न्यायाधीश एम. एल. तहिलयानी यांनी या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला असून तो गुरूवारी (ता. ६) दिला जाईल. निकम आणि त्यांच्यानंतर बचाव पक्षाचे वकील के. के. पवार अंतिम युक्तिवाद करतील.
तत्पूर्वी माध्यमांसमोर बोलताना निकम यांनी सांगितले, की कसाबला फाशी मिळावी यासाठी आठ सबळ कारणे आहेत. कसाबचे कृत्य पूर्वनियोजित आणि पूर्व संचालित होते. त्याने तरुण असो की वृद्ध, हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्चन असा कोणताही भेदभाव न करता लोकांना मारले. अतिशय नियोजनपूर्वक आणि कोणतीही दयामाया न दाखवता हे कृत्य तडीस नेले. कसाब आणि अबू इस्माईल या दोघांनी मिळून ७२ जणांना मारले. त्यात १४ पोलिसांचा समावेश आहे. बाकीचे लोक असहाय्य आणि कोणत्याच प्रकारे प्रत्युत्तर देण्याच्या स्थितीत नव्हते. या मृतांपैकी आठ महिला आणि सात लहान मुले होती. कसाबने फक्त लोकांचे शिरकाणच केले असे नाही, तर त्याने या कृत्याचा "आनंदही' घेतला. मानवी जिवाची त्याला काही पर्वा नाही, हेच त्यावेळच्या फोटोतून दिसून येते.
त्या दिवशी सीएसटीवर गर्दी कमी होती, त्यामुळे जास्त माणसांना मारता आले नाही, याचे "दुःख' त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यावरून हा प्राण्यांपेक्षाही जास्त निर्घृण असल्याचे सिद्ध होते, अशा शब्दांत निकम यांनी कसाबचे क्रौर्य मांडले. बोटीने ते एक तास उशिरा आले. त्यामुळे मोठी गर्दी त्यापूर्वीच निघून गेल्याचे दुःख त्याच्या जबानीतून दिसून येते याकडे निकम यांनी लक्ष वेधले.
कसाब आणि इस्माईलनेच कुबेर या बोटीचा मालक अमरचंद सोलंकीला कोणतीही दयामाया न दाखवता मारले. एखाद्या कसायासारखे मारून कसाब आपल्या नावाला जागला, असा घणाघाती प्रहार निकम यांनी केला.

No comments: