Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 5 May, 2010

मुंबई पूर्वपदावर

मुंबई, दि. ४ : गेले दोन दिवस मुंबईकरांना वेठीस धरणारा संप अखेर मंगळवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. एस्माचा बडगा, अटक आणि दाखल केलेले गुन्हे, शिवसेना-मनसेनेने दिलेले इशारे आणि सरकारच्या वाटाघाटी यामुळे अखेर मोटरमन संघटनेने हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेसेवा सुरू झाल्या आणि मुंबई पूर्वपदावर आली.
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज दुपारी संपकरी मोटरमनची भेट घेतली. मोटरमनच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे मध्यस्थी करेल असे आश्वासन पाटील यांनी मोटरमन संघटनेला दिले. मोटरमनच्या न्याय्य मागण्यांसाठी समिती नियुक्त करण्यात येईल, कारवाई म्हणून अटक केलेल्या मोटरमनांची सुटका करण्यात येईल, त्यांच्यावर लावलेले फौजदारी गुन्हे मागे घेण्यात येतील, रेल्वेकडून होणारी शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येणार नाही.
पगारवाढीसह इतर काही मागण्यांसाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या ८०० मोटरमननी सोमवारी उपाशीपोटी लोकल चालवण्याचे आंदोलन सुरू केले होते. शिवसेनेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या आंदोलनात नंतर भाजपनेही उडी मारली. मुंबईतील ७० लाख प्रवाशांना या संपाचा फटका बसला असून सीएसटी, चर्चगेट, दादर अशा स्टेशनांच्या परिसरात तर अराजकसदृश स्थितीच निर्माण झाली.
दरम्यान, सीएसटी स्टेशनवर बेकायदेशीररीत्या जमाव करून रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपावरून आंदोलन करणाऱ्या १७० मोटरमनना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संध्याकाळनंतरही आंदोलन सुरूच ठेवल्यास त्यांच्यावर अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत (एस्मा) कारवाई करण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार होता.

No comments: