Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 May, 2010

नक्षलवाद्याला म्हापशात अटक

१७ साथीदार पोलिसांच्या ताब्यात
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): गोव्याला अतिरेक्यांकडून धोका असल्याच्या वावड्या वारंवार उठत असतानाच ओरिसा पोलिसांना हवा असलेला जहाल तरुण नक्षलवादी शंभू बेक (२५) याला आज अत्यंत शिताफीने अटक करण्यास अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेनू बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या पथकाला आले आहे. शंभू हा "माओवादी त्रिशूल मंच' या नक्षलवादी संघटनेचा अध्यक्ष असून त्याच्यावर खून, दरोडे, हत्यारांची तस्करी असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद असून तो ओरिसा येथे "मोस्ट वॉंटेड' होता.
आज सायंकाळी सहा वाजता म्हापसा येथून या नक्षलवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, म्हापसा, जुने गोवे व भोम येथे त्याच्या संपर्कात असलेल्या ओरिसा येथील सतरा जणांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सतरा जण या भागातील विविध कारखान्यांत नोकरीला होते, अशी माहिती गोवा पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. त्याचा ताबा घेण्यास ओरिसा पोलिस गोव्यात दाखल झाले असून उद्या त्यांना घेऊन ते ओरिसाला रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आठ दिवसांपूर्वी आोरिसातील सुंदरगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी शंभू बेक हा गोव्यात असल्याची माहिती गोवा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक बंसल यांच्या अध्यक्षतेखाली खास पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. त्यात गुन्हा अन्वेषण विभागाचा एका पोलिस उपनिरीक्षक व "आयआरबी'च्या पोलिस जवानांचा समावेश होता. चार दिवसांपासून विविध ठिकाणी गुप्तहेर पाठवून माहिती गोळा करण्यात आल्यानंतर शंभू हा वापरत असलेला मोबाईल क्रमांक या पथकाच्या हाती लागला. त्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यात आली. आज सायंकाळी म्हापसा येथे तो असल्याची ठोस माहिती या पथकाच्या हाती लागताच त्याठिकाणी सशस्त्र पोलिसांनी छापा ठाकून त्याला अटक केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून शंभू हा अधूनमधून या तरुणांबरोबर गोव्यात येऊन थांबत होता. मात्र, गोव्यात कोणता विध्वंस करण्याचा हेतू होता का, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार भोम येथे हे संशयित भाड्याची खोली घेऊन राहत होते व ते जवळच्याच औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीत काम करत होते. तथापि, शंभू हा नक्षलवादी कोणतेही काम न करता बेकारच होता. तो दिवसभर सर्वत्र फिरून टेहळणी करण्याचे काम करत होता. त्याचे सहकारी वसाहतीत कामाला जात असल्याने त्याच्यावर कोणालाही संशय घेण्यास वाव नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.
----------------------------------------------------------------
गोवा पोलिसांच्या सुस्त कारभारामुळे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांसाठी गोवा हे नंदनवन ठरले असून राज्यात नक्षलवाद्यांचा वावर असल्याचा दावा गेल्या वर्षी विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी गृहखात्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत केला होता. त्यावेळी कोणताही कारवाई पोलिसांनी केली नसल्यानेच आज जहाल नक्षलवाद्यांना लपण्यासाठी पोषक वातावरण हे पोलिसांच्या कारभारामुळे निर्माण झाले आहे, असा संशय प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.

No comments: