Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 1 October, 2009

मिकीला हात लावाल तर खबरदार!

आलेमाव बंधू पुन्हा गरजले

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- मिकी पाशेको यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर केलेली टीका हे त्यांचे वैयक्तिक मत आहे पण त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचे प्रयत्न झाल्यास संपूर्ण आलेमाव कुटुंबीय त्यांच्यामागे ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी दिला. मिकी व आलेमावबंधू एकत्र येण्यात मुख्यमंत्री कामत यांचा फायदा आहे व या दिलजमाईमुळे कामत यांचे स्थान अधिक मजबूत झाल्याचेही ते म्हणाले.
आज इथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मिकी यांच्याविरोधात दाखल केलेल्या पोलिस तक्रारीची चौकशी पोलिस करतीलच व सत्य काय तेही उघड होईल,असे सांगून आणखीनही काही मंत्र्यांवर पोलिस तक्रारी दाखल झाल्या आहेत त्याचे काय,असा सवालही त्यांनी केला. राज्यात वाढत्या चोऱ्या,दरोडे व मूर्तिभंजनाचे प्रकार पाहिल्यास त्यातील गुन्हेगारांना पकडण्यात अपयश येत असलेले पोलिस राजकीय नेत्यांच्या पाठीमागे कसे काय लागतात,असे काही पत्रकारांनी विचारले असता या प्रश्नाचे उत्तर गृहमंत्री रवी नाईक हेच योग्य पद्धतीने देऊ शकतात,असे ते म्हणाले. मिकी व आलेमावबंधू यांच्यात वैमनस्य स्थापन करून आपली पोळी भाजण्यासाठी एक नेता सक्रिय होता व योग्य वेळ आल्यानंतर त्याचे नाव जाहीर करू,असे ते म्हणाले.

No comments: