Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 September, 2009

नेतृत्वबदलाच्या मागणीस पुन्हा जोर मिकींनी डागली मुख्यमंत्र्यांवर तोफ

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी): पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरोधात कॅसिनोसंदर्भात आधी गुन्हा दाखल करून मग त्यांच्या अटकेची जोरदार तयारी केल्यामुळे कॉंग्रेस विधिमंडळ पक्षातील एक गट खवळला असून त्याने उचल खाल्ली आहे. त्यामुळे पडद्याआडून सुरू झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींअंतर्गत या गटाने थेट नेतृत्वबदलाची मागणी करून मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले आहे.
कॉंग्रेस सूत्रांकडूनच मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री दिगंबर कामत हे आपले आसन टिकवण्यासाठी सूडाचे राजकारण करत असल्याची सदर गटाची ठाम धारणा बनली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पदावरून खाली खेचण्यासाठी त्यांच्या विरोधकांना एकत्र करण्याच्या हालचाली या गटाने चालवल्या असल्याचे कळते.
पाशेकेा प्रकरणात सरकारची पुरती अप्रतिष्ठा झाली आहे. यापूर्वी नंबरप्लेट प्रकरणातही मुख्यमंत्र्याचे कोणीच ऐकत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातून सरकारामधील अनागोंदी अधिक ठळकपणे समोर आली आहे. सरकारचा हा सूडबुद्धीचा कारभार यापुढेही असाच सुरू राहिला तर सरकारचे काही खरे नाही, अशी उघड टीका होऊ लागली आहे. पक्षातील काही गटांना आता असे वाटू लागले आहे की, सभापती प्रतापसिंह राणे किंवा गृहमंत्री रवी नाईक यांनी सरकारचे सुकाणू हाती घ्यावे.
पाशेको हे मंत्री असताना चार महिन्यांपूर्वीच्या गुन्ह्यांत त्यांना अडकवण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला त्यामुळे कॉंग्रेसमधीलमोठा गट संतापला आहे. हा गट याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना उघडपणे दोष देऊ लागला आहे. आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर या गटातील सूत्राने सांगितले की, मिकी पाशेको व चर्चिल आणि ज्योकिम हे आलेमाव बंधू एकत्र आल्यामुळे सदर प्रकरण उपस्थित झाले आहे.
पंधरवड्यापूर्वीच दिल्लीतील गोवा प्रभारी हरिप्रसाद व श्रेष्ठींचे निरीक्षक येथे आले होते ते ज्योकिम यांना मंत्रिमंडळांतून वगळण्याचा ठोस प्रस्ताव घेऊनच, पण मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी माघार घेतली. ज्योकिमबाबत मवाळ झालेले मुख्यमंत्री मिकी प्रकरणात एवढे सक्रिय झाले आणि त्यांनी आपल्याच सरकारची छीथू होऊ दिल्याबद्दल हा गट भलताच नाराज झाला आहे. नवरात्र संपताच हा गट सक्रिय होईल व पुढील घडामोडी घडतील, असा कयास आहे.
मिकींनी तोफ डागली
दरम्यान, नवनवी प्रकरणे उपस्थित करून त्यात आपणास अडकवण्याच्या प्रकारांमुळे संतप्त बनलेले पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी यामागे मुख्यमंत्रीच असल्याचा आरोप करून नेतृत्वबदलाची मागणी केली आहे. केवळ आपणच नव्हे तर विश्र्वजित राणे व बाबूश मोन्सेरात यांच्यामागे न्यायालयीन खटल्याचे शुक्लकाष्ठ लावण्यामागेही तेच आहेत, असा आरेाप त्यांनी केला.
एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना मिकी म्हणाले की, विद्यमान नेतृत्वाबद्दल आपण समाधानी नाही; पण त्याचबरोबर आपणास सरकार पाडण्यातही रस नाही. प्रत्येक प्रकरणात सरकारप्रमुख तोंडघशी पडत आहे. मंत्र्यांची-नेत्यांची परस्परांशी भांडणे लावून देऊन यापुढे दिवस ढकलणे त्यांना शक्य होणार नाही. कारण ते दिवस आता संपले आहेत.
मुख्यमंत्री प्रामाणिक असते तर कॅसिनो खंडणीप्रकरणाची वस्तुस्थिती त्यांनी आपणाकडून जाणून घेतली असती. कोणताही वाद निर्माण होतो तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी सर्वांना विश्वासात घ्यायला हवे. तथापि, ते तसे कधीच करत नाहीत. त्यामुळे प्रकरणे चिघळतात. नंबरप्लेटचा सुरू असलेला घोळ हे त्याचेच निदर्शक असल्याचे मिकी यांनी नमूद केले.
आपणाला मंत्रिमंडळा्तून वगळणे त्यांच्या हाती नाही. कारण आपणाला मंत्रिपद मिळाले आहे ते राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींकडून. आम्हीच कॉंग्रेसला परत सत्तेवर आणले हे आमच्यावर कारवाई करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. कॉंगे्रस आपल्यावर कोणती कारवाई करणार तेच आपल्याला पाहायचे आहे. कॉंग्रेसने प्रथम मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी. ज्या प्रकारे आपणास कॅसिनो खंडणी प्रकरणात अडकवले गेले त्यामुळे आपण मनस्वी दुखावलो गेलो आहोत. मुख्यमंत्र्यांकडून आपणास ही अपेक्षा नव्हती असे मिकी म्हणाले.

No comments: